
राज्यात मे महिन्याच्या सुरवातीलाच उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असताना दुसरीकडे राज्याच्या विविध भागात पाणी पुरवठय़ासाठी टँकरची संख्याही वाढण्यास सुरवात झाली आहे. राज्याच्या विविध भागात सध्याच्या घडीला 277 टँकरच्या सहाय्याने वाडय़ा-वस्त्यांची तहान भागवली जात आहे. पण पुढील काही काळात टँकरची मागणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात सध्या कोरोनाशी लढा सुरू असताना दुसरीकडे राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा राज्यात ज्या भागात पाणी कमी आहे अशा भागाला टँकरने पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्याच्या काही भागात टँकरची मागणी वाढत आहे. 3 मे रोजीच्या आकडेवारीनुसार राज्याच्या वेगवेगळ्या भागात 202 टँकरच्या सहाय्याने पुरवठा सुरु होता. पण या आठवडय़ात टँकरच्या पाण्याची मागणी अचानक वाढली आहे. सध्याच्या घडीला सुमारे 277 टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. त्यात सर्वाधिक म्हणजे 100 टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, जिह्यात सुरु आहे. सुदैवाने सिंधुदुर्ग जिह्यात अजून तरी टँकरने पाणी पुरवठय़ाची वेळ आलेली नाही असे आकडेवारीवरून दिसते. मात्र त्याखालोखाल 52 टँकरच्या सहाय्याने अमरावती, वाशिम, बुलढाणा व यवतमाळ या जिह्यात सुरु आहे.
मागील वर्षापेक्षा स्थिती चांगली
मागील दोन वर्षांच्या तुलनेत वर्षीच्या तुलनेत यंदाची परिस्थिती खूपच चांगली आहे. 2019च्या मे महिन्यात अभूतपूर्व पाणी टंचाई होती. दोन वर्षांपूर्वी मे महिन्यात 5 हजारांहून अधिक टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा सुरु होता. सध्याच्या काळात परिस्थिती चांगली आहे पण पुढील काही काळात राज्यातील काही भागात टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सध्या खासगी व सरकारी टँकरच्या मदतीने टँकरचा पुरवठा सुरु आहे अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील एका अधिकाऱयाने दिली.
धरणातील पाणीसाठा घटतोय
राज्यातल्या धरणांमधील पाणीसाठाही कमी होत आहे. जलसंपदा विभागाकडील आकडेवारीनुसार राज्यातील धरणांमध्ये एकूण पाणीसाठा 49. 81 टक्के आहे. तर उपयुक्त पाणीसाठा 39. 92 टक्के आहे. मात्र मृत पाणीसाठा 96. 98 टक्के आहे. मृत पाणीसाठय़ाला हात लावला जात नाही. अगदीच भीषण पाणीटंचाई झाली तरच मृत पाणीसाठा पंपाच्या सहाय्याने उपसला जातो. आपत्कालीन परिस्थितीत मृत पाणीसाठय़ाचा वापर होतो.
कुठे किती टँकर
- ठाणे 29
- रायगड 24
- रत्नागिरी 12
- पालघर 35
- नाशिक 38
- नगर 10
- पुणे 34
- सातारा 12


























































