तानसा नदी पात्रात ओली पार्टी सुरू असतानाच धरणातून आलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्यात पर्यटकांची गाडी बुडाल्याची घटना शहापुरात आज सकाळी घडली. धक्कादायक म्हणजे ही घटना घडली तेव्हा गाडीत पाचजण पार्टी करत होते. त्यातील चौघांनी काही क्षणात गाडीबाहेर उड्या मारल्या. मात्र एकाचा गुदमरून मृत्यू झाला असून दुसऱ्याचा अद्याप शोध लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात गाडी लावून गटारी साजरी करणे चांगलेच अंगलट आले आहे.
कल्याणमध्ये राहणारे गणपत शेलकंदे हे आपल्या पाच मित्रांसह शहापूर तालुक्यातील तानसा धरण क्षेत्रात गटारी साजरी करण्यासाठी गेले होते. धरणाच्या मागील बाजूला नदीकिनारी गाडी लावून पार्टीचे नियोजन सुरू होते. मात्र मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले गेले व पाण्याचा प्रचंड लोंढा तानसा नदीच्या दिशेने वाहू लागला. त्यामुळे काही समजण्याअगोदरच पर्यटकांची क्वॉलिस गाडी पाण्यात वाहू लागली. गाडीत पाणी घुसू लागल्याने आतमध्ये असलेल्या पाचपैकी चौघांनी बाहेर उड्या मारल्या. परंतु गणपत शेलकंदे यांचा गाडीतच गुदमरून मृत्यू झाला. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी गणपत यांचा मृतदेह बाहेर काढला. परंतु अन्य एकजण बेपत्ता असून त्याचा सायंकाळपर्यंत शोध लागला नव्हता. पाण्याची पातळी वाढल्याने स्वयंचलित २४ दरवाजे उघडले. त्यामुळे अचानक पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होऊन दुथडी भरून तानसा नदी वाहू लागल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.