नाना पाटेकरांना क्लीन चीट कशी मिळाली? तनुश्रीचा थेट मोदींना सवाल

सामना ऑनलाईन, मुंबई

तनुश्री दत्ता विनयभंग प्रकरणी मुंबई पोलिसांनी नाना पाटेकर यांना क्लीन चिट दिल्यानंतर आता तनुश्रीने थेट पंतप्रधानांकडे न्यायाची मागणी केली आहे. पोलिसांनी पैसे खाऊन हे प्रकरण मिटवल्याचा आरोप करताना तनुश्रीने, कुठे आहे तुमचा भ्रष्टाचारमुक्त देश? अशी विचारणाही पंतप्रधानांना केली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ओशिवरा पोलिसांनी तनुश्री दत्ताचा विनयभंग झाल्याची तक्रार खोटी आणि पूर्वग्रहदूषित असल्याचं म्हणत नाना पाटेकर यांना क्लीन चिट दिली होती. त्यावर तनुश्री दत्ता हिने प्रतिक्रिया दिली आहे. 2008मध्ये सिन्टाकडे दिलेल्या तक्रारीबाबतचे पुरावे आपण पोलिसांकडे सादर केले होते. याशिवाय त्यावेळी सिन्टाने आपल्या तक्रारीची दखल न घेतल्याबाबत माफीपत्रही सगळीकडे प्रसारित झालं होतं. त्याची प्रतही तनुश्रीतर्फे पोलिसांना देण्यात आली होती. जेव्हा या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली, तेव्हाही पोलिसांनी हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता, असा गंभीर आरोप तनुश्रीने केला आहे.

जर पुरावे देऊनही पोलीस नाना पाटेकर यांना क्लीन चिट देत असतील तर निश्चितच त्यांना या प्रकरणात पैसे खाल्ले आहेत. नाना पाटेकर यांनीच पैसे देऊन या प्रकरणी क्लीन चीट मिळवली आहे. जर असं घडत असेल तर या देशात भ्रष्टाचाराने आपली नीचतम पातळी गाठली आहे. या देशात एक स्त्री जेव्हा अशा गोष्टीविरुद्ध आवाज उठवते तेव्हा तिला तिचं आयुष्य पणाला लावावं लागतं. हेच तुमचं रामराज्य आहे का? मोदीजी उत्तर द्या, असा प्रश्न तनुश्रीने विचारला आहे. तसंच नाना पाटेकर यांच्या नाम या फाउंडेशनला होणाऱ्या अर्थसाहाय्याबद्दलही तिने शंका उपस्थित केल्या आहेत.