काम करणाऱ्या बायकांमुळे समाज आणि कुटुंबे नष्ट होतात, महिलेचे सौंदर्यही नष्ट होते! बांग्लादेशी गोलंदाजाने तोडले अकलेचे तारे

काही दिवसांपूर्वीच आशिया चषक स्पर्धेत हिंदुस्थानविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तंझीम हसन साकिब वादात सापडला आहे. गेल्यावर्षी फेसबुकवर त्याने ‘काम करणाऱ्या बायकांमुळे समाज आणि कुटुंबे नष्ट होतात, महिलेचे सौंदर्यही नष्ट होते ‘असे फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अकलेचे तारे तोडले होते.आता सोशल मीडियावर त्याच्या या जुन्या पोस्ट व्हायरल होत असून चाहत्यांकडून हल्लाबोल होत आहे.

 स्त्रीवाद्यांनी त्याच्या जुन्या पोस्ट व्हायरल करण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये त्याने सोशल मीडियावर महिलांबद्दल अपमानास्पद गोष्टी पोस्ट केल्या होत्या.तंझीमने गेल्यावर्षी फेसबुकवर पोस्ट शेअर केली होती, त्यामध्ये लिहीले होते की, ‘जर महिला कामावर जात असतील तर पती आणि मुलांच्या अधिकारांवर गदा येते. काम करणाऱ्या बायकांमुळे समाज आणि कुटुंबे नष्ट होतात, महिलेचे सौंदर्यही नष्ट होते! असे लिहीले होते. अलिकडच्या वर्षांत बांगलादेशच्या आर्थिक विकासाला चालना देणार्‍या कपड्यांच्या कारखान्यांमध्ये बहुसंख्य महिला काम करतात. परंतु बहुसंख्य मुस्लिम देशात परंपरावादी पुरुषप्रधान वृत्ती कायम आहे. अन्य एका पोस्टमध्ये तंझीमने पुरुषांना इशारा देत सांगितलेय की, जर त्यांच्या मुलांनी विद्यापिठांमध्ये मित्रांसोबत मोकळेपणाने मिसळणाऱ्या मुलीशी लग्न केले तर त्यांना चांगली आई मिळणार नाही.

मात्र प्रकरण वाढल्यानंतर आता बांगलादेश क्रिकेट बोर्ड कारवाईच्या तयारीत आहे. तंझीम हसन साकिबच्या पोस्टची चौकशी सुरू केली आहे. पॅरिस येथील स्त्रीवादी लेखिका आणि उद्योगपती जन्नतुन नईम प्रीती यांनी लिहिले, ‘बांगलादेश संघाच्या जर्सी त्या कारखान्यांमध्ये बनवल्या जातात जिथे बहुतेक महिला काम करतात. मला खेद होत आहे की, तुम्ही तुमच्या आईला सामान्य व्यक्ती मानत नाही.