तासगावकर कॉलेजांची मालमत्ता जप्त होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

गेल्या 17 महिन्यांपासून प्राध्यापकांचे वेतन थकवणाऱया वादग्रस्त तासगावकर समूह कॉलेजांची मालमत्ता जप्त करण्याची नोटीस प्रॉव्हिडंट फंड कमिशनर यांनी बजावली आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम या कॉलेज व्यवस्थापनाने भरली नव्हती. तसेच संचालकांनी स्वतःच्या नातेवाईकांनाच कर्मचारी म्हणून दाखवून मोठय़ा प्रमाणात आर्थिक घोटाळा केल्याचे उघड झाले होते.

कर्जत येथे असलेल्या तासगावकर कॅम्पसमध्ये सहा विविध महाविद्यालये आहेत. प्राध्यापकांचे वेतन थकवणे, प्रॉव्हिडंट फंडाची (पीएफ) रक्कम न भरणे यामुळे हा समूह वादात सापडला होता. ‘मुक्ता’ शिक्षक संघटनेने त्यासंदर्भात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), पीएफ कमिशनर, मुंबई विद्यापीठ आणि संबंधित विभागांकडे तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारीवरून एआयसीटीईने तासगावकरच्या सर्व महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष प्रवेशास मनाई केली होती. तर पीएफ कमिशनर यांनी संस्थाचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

पीएफ कमिशनर यांनी केलेल्या चौकशीत तासगावकर समूहाच्या वायटीआयटी या एकाच महाविद्यालयामधील कर्मचाऱयांचा कोटय़वधींचा प्रॉव्हिडंट फंड भरला नसल्याचे उघड झाले आहे. अद्याप इतर महाविद्यालयांची चौकशी बाकी आहे. त्यामुळे पीएफ कमिशनर यांनी महाविद्यालयांच्या मालमत्ता जप्तीचीच नोटीस बजावली आहे. मुंबई विद्यापीठाने मात्र अद्याप काहीच कारवाई केलेली नाही असा आरोप ‘मुक्ता’ शिक्षक संघटनेचे महासचिव प्रा. सुभाष आठवले यांनी केला आहे.