टाटा हॉस्पिटलच्या माध्यमातून 5300 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची मदत

संतोष आंधळे

सध्या कोरोनाच्या या कहरात देशभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारात मोलाची भूमिका बजावणाऱया ऑक्सिजनची तीव्र टंचाई जाणवत आहे. ऑक्सिजनचा साठा उपलब्ध व्हावा म्हणून राज्य आणि केंद्र सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. परदेशातून ऑक्सिजन आयात केला जात आहे. या अशा परिस्थितीत टाटा मेमोरियल सेंटरने अमेरिकेतील दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्था यांच्याकडून 5300 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची मदत मिळवली असून त्यापैकी 3800 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आज हिंदुस्थानात दाखल झाले असून उर्वरित  कॉन्सन्ट्रेटर्स लवकरच येत्या काळात मिळणार आहेत. टाटा मेमोरियल सेंटर हे कॉन्सन्ट्रेटर्स हिंदुस्थानातील विविध 36 रुग्णालयांना देणार आहे. यामुळे ऑक्सिजनची गरज लागणाऱया रुग्णांना या उपकरणांचा मोठा फायदा होणार आहे.

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स हे पोर्टेबल वैद्यकीय उपकरण असून याद्वारे 5-10 लिटर्स मिनिटाला रुग्णाला ऑक्सिजन देता येतो. त्यामुळे ज्या रुग्णालयात पाइप ऑक्सिजनची जोडणी नाही त्यांना याचा विशेष फायदा होणार आहे. ऑक्सिजनची टंचाई पूर्ण हिंदुस्थानात असून अनेक रुग्णालये ऑक्सिजन मिळविण्यासाठी विविध प्रयत्न करत असताना या मदतीमुळे रुग्णांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष करून या मदतीत अमेरिकेतील हिंदुस्थानींचा मोठा वाटा आहे. आज सकाळी फेडेक्स या कार्गे विमानाने मुंबई विमानतळावर 3400 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि 3 लाख एन 95 मास्क उतरविण्यात आले. तर त्यानंतर काही काळाने एअर इंडियाच्या विमानाने 400 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स दिल्ली विमानतळावर उतरविण्यात आले.

याबाबत अधिक माहिती देताना टाटा मेमोरियल सेंटरचे डॉ. राजन बडवे यांनी सांगितले की, ‘सध्या ऑक्सिजनची परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. आज जी काही मदत अमेरिकेतील दानशूर व्यक्तींनी केली आहे त्यामुळे  या वैद्यकीय उपकरणांमुळे रुग्णांचा श्वास चालू राहण्यासाठी मोठी मदत होणार आहे. हिंदुस्थानातील विविध भागांतील रुग्णालयांना हे उपकरण देण्यात येणार आहे. ज्या पद्धतीने जगभरातील दानशूर आणि सामाजिक संस्थांनी ही मदत केली आहे  त्याबद्दल मी खरेच त्या सर्वांचा आभारी आहे. टाटा रुग्णालयात पॅन्सरच्या आजारासोबत ज्या व्यक्तींना कोविड झाला आहे अशा व्यक्तींवर उपचार केले जात आहेत.

सध्या महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, केरळ, आंध्र प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, गुजरात, मिझोराम, कर्नाटक, बिहार, मध्य प्रदेश, आसाम, उत्तर प्रदेश या राज्यांतील रुग्णालयांचा समावेश आहे. लवकरच ही सर्व मदत राज्यातील रुग्णालयांना पाठवून दिली जाणार आहे.

या मदतीसाठी अनेकांनी परिश्रम घेऊन 10 दिवसांत ही मदत हिंदुस्थानात पाठवली त्याकरिता डॉ. सी. एस. परमेश, डॉ. पंकज चतुर्वेदी, तर अमेरिकेत स्थायिक असणारे गीतिका श्रीवास्तव, डॉ. नरेश रामरंजन, डॉ. पारुल शुक्ल यांनी विशेष परिश्रम घेतले.

महाराष्ट्रातील ज्या रुग्णालयांना ही मदत मिळणार आहे त्यामध्ये,  बी. के. वालावलकर हॉस्पिटल, रत्नागिरी; समर्थ कॅन्सर हॉस्पिटल, धुळे; सह्याद्री हॉस्पिटल, पुणे;  टाटा मेमोरियल हॉस्पिटल, खारघर; शीव हॉस्पिटल, सर जे. जे. रुग्णालय, सिडको कोविड रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय पनवेल, कोविड हॉस्पिटल कळंबोली, प्रमोद महाजन कोविड हॉस्पिटल, मीरा-भाईंदर, आयएनएचएस अश्विनी या रुग्णालयांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या