कोरोनाचा सामना करण्यासाठी ‘टाटा ट्रस्ट’ सरसावले, 500 कोटींच्या मदतीची घोषणा

1237

हिंदुस्थानात कोरोनाचा धोका वाढत आहे. याचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. देशावर आलेले संकट टाळण्यासाठी सीएम आणि पीएम सहाय्यता निधीमध्ये मदतीचा ओघ सुरू आहे. अंबानी, महिंद्रा आणि बजाज यांच्यानंतर आता टाटा ट्रस्ट मदतीसाठी पुढे सरसावले आहे. टाटा ट्रस्टने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी 500 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. बजाज ग्रुपने देखील 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती.

टाटा ट्रस्टने 500 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करताना म्हंटले की, कोरोना विषाणूंशी लढण्यासाठी जी यंत्रणा उभी करावी लागणार आहे, त्यासाठी याचा वापर करण्यात यावा. यावेळी टाटा ट्रस्टने सर्व बाधित रुग्णांचे संरक्षण आणि सबलीकरण करण्याची ग्वाही दिली आहे.

कोरोनाशी लढताना अग्रभागी असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) निर्माण करणे, वाढत्या घटनांवर उपचार करण्यासाठी, श्वसनप्रणाली निर्माण करणे, दरडोई चाचणी वाढविण्यासाठी, चाचणी किटची निर्मिती करणे, संक्रमित रूग्णांसाठी मॉड्यूलर उपचार सुविधा उभारणे, आरोग्य कर्मचारी आणि सामान्य लोकांचे ज्ञान व्यवस्थापन आणि प्रशिक्षण देणे, यासाठी हा निधी वापरला जाणारा आहे. उद्योजक रतन टाटा यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या