AI डेटा सेंटरसाठी TCS हिंदुस्थानात करणार 18 हजार कोटींची गुंतवणूक

टाटा समूहाची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने गुरुवार (21 नोव्हेंबर) आता नवीन AI डेटा सेंटर उभारण्यासाठी पाऊल उचलले आहे. AI डेटा सेंटर बांधण्यासाठी जागतिक पर्यायी मालमत्ता व्यवस्थापक टीपीजी सोबत त्यांनी भागीदारी केली आहे. हायपरव्होल्ट, एआय डेटा सेंटर युनिटला पुढे नेण्यासाठी दोन्ही कंपन्या काही वर्षांत संयुक्तपणे 18 हजार कोटींची गुंतवणूक करतील.

टीसीएसने म्हटले आहे की, “हायपरव्हॉल्टमधील गुंतवणूक इक्विटी, अनिवार्य परिवर्तनीय प्राधान्य शेअर्स आणि अतिरिक्त कर्जाद्वारे केली जाणार आहे. तसेच एकूण गुंतवणुकीपैकी टीपीजी 8 हजार 820 कोटींची गुंतवणूक करणार आहे.

TCS चे AI डेटा सेंटर्सवर लक्ष केंद्रित करणे सातत्याने वाढत आहे. कंपनी हिंदुस्थानात 1 गिगावॅट क्षमतेचे डेटा सेंटर बांधण्याची योजना आखत आहे. भविष्यात, AI कंपन्यांना वेगवान आणि कमी वीज वापरणाऱ्या डेटा सेंटर्सची आवश्यकता असेल. ही बदलती गरज पूर्ण करण्यासाठी TCS स्वतःला तयार करत आहे. उद्योगाच्या अंदाजानुसार, हिंदुस्थानचे डेटा सेंटर मार्केट 2030 पर्यंत 10 गिगावॅटपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे. सध्याच्या घडीला हे अंदाजे 1.5 गिगावॅट आहे.