कौटुंबिक वादातून शिक्षक पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून शिक्षक पतीने खून केल्याची खळबळजनक घटना आज मुरगूड शहरात घडली. सविता परशराम लोकरे (वय 45) असे ठार झालेल्या शिक्षक पत्नीचे नाव आहे. घटनेची फिर्याद मयत सविता यांची मुलगी अपूर्वा लोकरे (वय 25) यांनी मुरगूड पोलिसांत दिली. याप्रकरणी पोलिसांनी परशुराम पांडुरंग लोकरे (वय 53) व त्यांच्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.
मुरगूड पोलीस ठाण्याजवळ साई कॉलनीत राहणारे शिक्षक परशराम पांडुरंग लोकरे व त्यांची पत्नी शिक्षिका सविता लोकरे हे आपल्या अपूर्वाई बंगल्यात एक मुलगा व दोन मुली अशा कुटुंबासह राहतात. परशराम आणि पत्नी सविता यांच्यात कौटुंबिक कारणातून वारंवार वाद होत होता. आज सकाळी दोघांत वाद झाला. यावेळी मुलांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सविता बंगल्याच्या पाठीमागे भांडी घासण्यासाठी गेल्या असता अल्पवयीन मुलाने आईस धरले, तर पती परशराम यांनी हातातील वरवंट्याने पत्नीच्या डोक्यात घाव घालून ठार मारले.