
सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीसाठी लेखाधिकारी कार्यालयाकडून शिक्षकांची एजंटमार्फत आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप करीत हा भ्रष्टाचार थांबविण्याच्या मागणीसाठी नगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने लेखाधिकरी (माध्यमिक) कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षक व विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
सातव्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती करण्यासाठी लेखाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ अधिकारी एजंटमार्फत शिक्षकांकडून पैशांची मागणी करीत आहे. यापूर्वी संघटनेने वेतन निश्चितीसाठी तालुकास्तरावर कॅम्प लावण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, कार्यालय याकडे दुर्लक्ष करीत असून, या भ्रष्टाचारात या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सहभागी असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. सहाव्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती करताना तालुकास्तरावर कॅम्प लावण्यात आले होते. त्याप्रमाणे तालुकास्तरावर कॅम्प लावावे, शिक्षकांकडून एजंटमार्फत चालू असलेला पैसे उकळण्याचा भ्रष्टाचार त्वरीत थांबवावा, अनेक वर्षापासून या कार्यालयात सेवेत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची बदली करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. लेखी आश्वासन मिळत नाही तो पर्यंत ठिय्या आंदोलन चालू ठेवण्याचा पवित्रा शिक्षकांनी यावेळी घेतला होता.
या आंदोलनात शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र लांडे, सरचिटणीस आप्पासाहेब शिंदे, राज्याध्यक्ष चांगदेव कडू यांच्यासह अनेक शिक्षक सहभागी झाले होते. काही एजंटनी वेतन निश्चितीसाठी जिल्ह्यात विविध शाळांमध्ये जाऊन शिक्षकांकडून पैसे उकळण्याचा धंदा सुरू केला आहे. याला लेखाधिकारी कार्यालयाचे अभय आहे. या कार्यालयाकडून पारदर्शी कारभार होत नाही, तोपर्यंत आंदोलन चालू ठेवणार असल्याचे आप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले. लेखाधिकारी प्रधान यांनी शिक्षकांची समजूत काढून तालुकास्तरावर कॅम्प घेण्याचे व कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारचे पैसे मागितले जाणार नाही. तसेच याबाबत तक्रारी असल्यास समक्ष भेटण्याचे व दोषींवर कारवाई करण्याचे त्यांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. शिक्षकांना वेतन निश्चितीसाठी पैसे मागण्याचा प्रकार आढळल्यास 21 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

























































