हजारो शिक्षकांचा एल्गार; बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । नवी मुंबई

राज्यभरातील हजारो कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करणाऱ्या सुमारे 72 हजार शिक्षकांच्या 38 मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आहेत. या मागण्या राज्य सरकारने गांभीर्याने घेऊन तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा फेब्रुवारीमध्ये सुरू होणाऱया बारावीच्या परीक्षेवर असा इशारा राज्य सरकारला देण्यासाठी मुंबई विभागातील शेकडो शिक्षकांनी आज वाशी येथील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला.

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिह्यांतील शेकडो कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक आज वाशी रेल्वे स्थानक परिसरात जमा झाले. त्यांनी दुपारी एकच्या सुमारास मूकमोर्चा काढून माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय कार्यालयावर धडक दिली. यावेळी शिक्षकांनी सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, कायम विनाअनुदान तत्त्वावरील मूल्यांकनास पात्र महाविद्यालयांची यादी जाहीर करून त्यांना अनुदान देण्यास यावे, माहिती तंत्रज्ञान विषयास अनुदान मिळावे, 24 वर्षे सेवा झालेल्या सर्व शिक्षकांना निवडश्रेणी देण्यात यावी आदी प्रमुख मागण्यांसह सुमारे 38 मागण्या केल्या. या आंदोलनात मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष एस. एल. दीक्षित, कार्याध्यक्ष मुपुंद अंधळकर, महासचिव अनिल देशमुख, सुनील पूर्णपात्रे, दत्तात्रय चितळे, जगदीश पाटील आदी सहभागी झाले होते.