
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टिकून राहण्यासाठी खेळाडूंच्या फिटनेसला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड या देशांतील क्रिकेटपटूंच्या फिटनेसबाबत चोहोबाजूंनी कौतुक करण्यात येत असे.
आशिया खंडातील देशांतील क्रिकेटपटू हे फिटनेसमध्ये कायम मागे राहिले. पण आता यामध्ये बदल घडून आला आहे. टीम इंडिया फिटनेसमध्ये अग्रेसर होताना दिसत आहे. हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना यो यो टेस्टसोबतच दोन किमीच्या दौडमध्ये पास होणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानंतरच क्रिकेटपटूंना हिंदुस्थानी संघामध्ये स्थान देण्यात येत आहे.
टाइम ट्रायल टायमिंगचे आकलन होणार
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली व सचिव जय शहा यांच्याकडून फिटनेससाठीच्या नव्या स्टॅण्डर्डला परवानगी देण्यात आली आहे. बीसीसीआयकडून करारबद्ध करण्यात आलेल्या खेळाडूंना याबाबत सूचनाही देण्यात आली आहे.
दरवर्षी फेब्रुवारी, जून, ऑगस्ट/सप्टेंबर या कालावधीत या टेस्टचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान, बीसीसीआयकडून टाइम ट्रायलच्या टायमिंगचे आकलन दरवर्षी करण्यात येणार आहे. तसेच यावर संशोधनही करण्यात येणार आहे.
अशी असते दोन किमीची दौड
हिंदुस्थानचे फलंदाज व यष्टिरक्षक यांना दोन किमीची दौड आठ मिनिटे व 30 सेकंदांत पूर्ण करणे आवश्यक असते. तसेच हिंदुस्थानी गोलंदाजांना हीच दौड 8 मिनिटे व 15 सेकंदांत पूर्ण करावी लागते. तसेच यो यो टेस्टसाठी खेळाडूंना 17.1चा स्कोअर करणे आवश्यक असतो. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
2017 सालापासून यो यो टेस्ट सुरू
यो यो टेस्टची सुरुवात 1990 साली होती. त्यानंतर क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्यांदा या टेस्टचा उपयोग केला. 2017 सालापासून हिंदुस्थानी संघ खेळाडूंच्या फिटनेससाठी यो यो टेस्टचा उपयोग करीत आहे. फुटबॉलसाठी 21 आणि क्रिकेटसाठी 17 च्या वरील स्कोअर यो यो टेस्टसाठी बेंचमार्क ठेवण्यात आला आहे.
टेस्टपासून कसोटीपटूंची सुटका
दोन किमी व यो यो टेस्टपासून ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका खेळणाऱया क्रिकेटपटूंची सुटका करण्यात आली आहे. मात्र इंग्लंडविरुद्धच्या आगामी वन डे व टी-20 मालिका खेळणाऱया हिंदुस्थानच्या खेळाडूंना या टेस्ट द्यावा लागणार आहेत. तसेच या वर्षी हिंदुस्थानात आयोजित करण्यात येणाऱया टी-20 वर्ल्ड कपआधीही टीम इंडियाच्या खेळाडूंना टेस्ट द्यावी लागणार आहे.