गौतम गंभीर नक्कीच एक चांगला प्रशिक्षक असेल, टीम इंडियाच्या माजी कर्णधाराचे भाकित

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्याच्या शर्यतील अनेक देशी आणि विदेशी खेळाडूंची नावे चर्चेमध्ये आहेत. मात्र या सर्वांमध्ये आघाडीवर नाव आहे ते टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीर याचे. गौतम गंभीरच्या मेंटॉरशीपध्ये कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) IPL 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. इंडिया टु़डेच्या रिपोर्टनुसार गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्याची शक्यता जास्त आहे. यावरून टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने भाकित वर्तवल आहे.

मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये सौरभ गांगुलीने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकावरून सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य केले.”प्रशिक्षक हिंदुस्थानी असावा या मताचा मी आहे. जर गंभीरने मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज भरला असेल तर नक्कीच तो एक चांगला प्रशिक्षक असल्याचे सिद्ध होईल,” अस म्हणत सौरभ गांगुलीने एकप्रकारे गौतम गंभीरला पाठिंबा दर्शवला आहे. सौरभ गांगुली व्यतिरिक्त BCCI सचिव जय शाह यांनी सुद्धा टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हिंदुस्थानी प्रशिक्षकाला प्राधान्य देणार असल्याचे म्हंटले होते.