
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी प्रथमच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याशी असलेल्या संबंधांबाबत जाहीरपणे भाष्य केले आहे. कोलकाता येथे आयोजित ‘रेवस्पोर्ट्ज कॉन्क्लेव’मध्ये बोलताना गंभीर यांनी मान्य केले की, या दोन्ही स्टार खेळाडूंसोबतचे नाते हाताळताना त्यांच्याकडून काही त्रुटी राहिल्या असाव्यात. गेल्या दीड वर्षात आपल्याकडून काही चुका झाल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी कबुली त्यांनी यावेळी दिली.
गंभीर पुढे म्हणाले की, “मी देखील एक माणूस आहे आणि मलाही चुका करण्याचा अधिकार असायला हवा. खेळाडूंकडूनही चुका होऊ शकतात आणि गेल्या 18 महिन्यांत माझ्याकडूनही काही चुका झाल्या असतील, ज्या मी मान्य करतो. मात्र, माझी नियत नेहमीच साफ होती. चुकीच्या हेतूने घेतलेला निर्णय ड्रेसिंग रूममध्ये कधीही स्वीकारला जाऊ शकत नाही, पण प्रामाणिक हेतूने घेतलेला चुकीचा निर्णय स्वीकारार्ह असतो, असे माझे मत आहे.”
ड्रेसिंग रूममधील आपल्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण देताना गंभीरने सांगितले की, जोपर्यंत तो आपल्या खेळाडूंच्या डोळ्यांत डोळे घालून प्रामाणिकपणे बोलू शकतो, तोपर्यंत तो आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत असल्याचे त्याला वाटते. विशेष म्हणजे, गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर काही महिन्यांतच हिंदुस्थानचे हे दोन अनुभवी खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती, ज्या पार्श्वभूमीवर गंभीर यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.


























































