
9 सप्टेंबरपासून यूएईत सुरू होणाऱया आशिया कपसाठी हिंदुस्थानी संघात कोणाला संधी मिळेल आणि कुणाला विश्रांती, याचा अंदाज बांधत अनेकांनी आपापले संघ जाहीर केलेत, पण मंगळवारी हिंदुस्थानचा खरा संघ निवडण्यासाठी निवड समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत श्रेयस अय्यर आणि यष्टिरक्षक-फलंदाज जितेश शर्मा यांना पुनरागमनाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून (जुलै 2024) श्रेयस आणि जितेश यांना टी-20 संघात स्थान मिळालेले नाही. श्रेयसने शेवटचा टी-20 सामना डिसेंबर 2023 मध्ये खेळला होता, तर जितेश जानेवारी 2024 नंतर हिंदुस्थानी संघात कधीही दिसलेला नाही. संथ आणि कमी उंचीच्या यूएईच्या खेळपट्टय़ांवर मधल्या फळीत अनुभवी फलंदाजाची गरज असल्याचे संघ व्यवस्थापनाचे मत असल्यामुळे ही जागा श्रेयसने भरण्याची शक्यता आहे. जर श्रेयसची निवड झाल्यास शिवम दुबे किंवा रिंकू सिंग यांच्यापैकी एकाला बाहेर बसावे लागू शकते.
जितेशने आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पहिल्यांदाच विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे तो ध्रुव जुरेलची जागा घेऊ शकतो. इंग्लंड मालिकेत जुरेल हा संजू सॅमसनचा राखीव यष्टिरक्षक होता.
गिल-जैसवालची शक्यता कमी
शुभमन गिल आणि यशस्वी जैसवालच्या पुनरागमनाबद्दल चर्चेला उधाण आले होते. मात्र गंभीर यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने शेवटच्या 15 पैकी 13 सामने जिंकले असल्यामुळे विद्यमान आधीच्या संघावर भर देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. याशिवाय 28 सप्टेंबरला आशिया कप फायनल आणि 2 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध पहिला कसोटी सामना सुरू होणार असल्याने गिल-जैसवाल यांना कसोटी मालिकेसाठी ताजेतवाने ठेवण्याचा विचार संघ व्यवस्थापन करत आहे. त्यामुळे आशिया कपसाठी नेमकी कुणाची वर्णी लागतेय, त्याचा अंदाज बांधणे जरा कठीण होऊन बसलेय.