अखेर टीम इंडियाचा चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सुटला! ‘या’ खेळाडूच्या नावावर मोहोर

2324

क्रिकेट विश्वचषकापासून सुरू असलेला टीम इंडियाचा चौथ्या क्रमांकाचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. टीम मॅनेजमेंटने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर याच्या नावाला हिरवा कंदिल दिला आहे. नंबर चारवर गेल्या काही महिन्यांपासून केलेले अनेक प्रयोग फसल्यानंतर अय्यरच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. बांगलादेशविरुद्ध झालेल्या अंतिम टी-20 लढतीत चौथ्या क्रमांकावर येऊन अय्यरने तुफानी खेळी केली. याच खेळीमुळे त्याला टीम इंडियाचे कामयस्वरुपी तिकीट मिळणार आहे.

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकादरम्यान टीम इंडियाने नंबर चारवर अनेक खेळाडूंना संधी देऊन पाहिली. परंतु एकही खेळाडू सलग चांगली कामगिरी करून आपली जागा पक्की करू शकला नाही. विजय शंकर, ऋषभ पंत यांनाही चौथ्या क्रमांकावर संधी मिळाली. मात्र हे दोघेही विशेष प्रभाव पाडू शकले नाही. परंतु अय्यराने गेल्या काही दिवसात मिळालेल्या संधीचा पुरेपुर फायदा उठवत चौथ्या क्रमांकावर आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे.

हिंदुस्थानचा नेत्र‘दीपक’ विजय

रविवारी बांगलादेशविरुद्ध नागपूरमध्ये झालेल्या निर्णायक टी-20 लढतीत श्रेयस अय्यराने 33 चेंडूत 62 धावांची धुव्वाधार खेळी केली. या खेळीमुळे टीम इंडिया बांगलादेशसमोर आव्हानात्मक धावसंख्या रचू शकला. यानंतर बांगलादेशला 144 धावांमध्ये रोखत 30 धावांनी विजय मिळवत मालिका जिंकली. या खेळीनंतर बोलताना अय्यर म्हणाला की, ‘टीम मॅनेजमेंटने मला तूच आता चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करशील हे सांगितले आहे. चौथ्या क्रमांकावर दावा ठोकण्यासाठी गेल्या काही मालिकेतील कामगिरी उपयुक्त ठरली. या क्रमांकासाठी टीम इंडियात मोठी स्पर्धा आहे’, असेही तो म्हणाला.

‘फिनिशर’ची गरज
सलामीची जोडी आणि विराट लवकर बाद झाल्याच अशा मोक्याच्या क्षणी विकेट टिकवून धावा करणाऱ्या एका ‘फिनिशर’ची टीम इंडियाला गरज आहे. विराट आणि रोहित झटपट बाद झाल्यास शेवटपर्यंत फलंदाजी करू शकणारा खेळाडू संघाला हवा आहे. ही भूमिका क्रमांक चारवरील खेळाडू चांगली बजावू शकतो. मी आजही तेच करण्याचा प्रयत्न केला, असे अय्यर बांगलादेशविरुद्धचा सामना संपल्यानंतर म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या