
दिल्लीहून बँकॉकच्या दिशेने जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे विमान साडे सात तास विमानतळावरच अडकून पडल्याचं वृत्त आहे. त्यामुळे विमानातील 300 प्रवासी प्रचंड हैराण झाले. त्यांना एअर इंडियाकडून खाण्यापिण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली नाही, असा आरोप प्रवाश्यांनी केला आहे. या प्रवाश्यांनी ट्विटरवर एअर इंडियाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हे विमान बँकॉकच्या दिशेने उड्डाण करणार होतं. त्यासाठी सगळे प्रवासी विमानात बसले. मात्र, त्याच वेळी विमान उडण्यासाठी थोडा अवधी लागणार असल्याची घोषणा झाली. दर थोड्या वेळानंतर ही घोषणा होत राहिली आणि सुमारे साडे सात तास ते तिथेच अडकून राहिलं. त्या वेळात कुणालाही विमानातून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर जेव्हा उड्डाण केलं नाही, तेव्हा प्रवाश्यांनी वैतागून ट्वीट करत आपली नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली.
या दरम्यान प्रवाश्यांना खाण्या-पिण्यासाठी काहीही देण्यात आलं नाही, अशी माहिती मिळत आहे. या ट्वीट्सनंतर एअर इंडियाने माफी मागत काहीतरी तांत्रिक अडचणींमुळे वेळ लागल्याचं म्हटलं. तसंच, उपस्थित कर्मचाऱ्यांनाही प्रवाश्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले.