बिहारच्या राजकारणाला वेगळं वळण; ‘राजद’मधून हकालपट्टी झालेल्या तेजप्रताप यादव यांची स्वतंत्र आघाडी, 5 पक्षांची मिळाली साथ

बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. वर्षाच्या अखेरीस ही निवडणूक पार पडेल असा अंदाज आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलाला (आरजेडी) मोठा धक्का बसला आहे. राजदमधून काही दिवसांपूर्वी हकालपट्टी करण्यात आलेल्या तेजप्रताप यादव यांनी स्वतंत्र आघाडी केली असून त्यांना बिहारमधील 5 पक्षांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे बिहारच्या राजकारणाला वेगळे वळण लागले आहे.

राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी काही दिवसांपूर्वी तेजप्रताप यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. राजदमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक तेजप्रताप यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली होती. मात्र आता त्यांनी स्वतंत्र आघाडी स्थापन केली आहे.

विकास वंचित इन्सान पार्टी, भोजपुरिया जनमोर्चा, प्रगतीशील जनता पार्टी, संयुक्त किसान विकास पार्टी आणि वाजिब अधिकार पार्टी या पक्षांशी तेजप्रताप यादव यांनी हातमिळवणी केली आहे. मंगळवारी पत्रकार परिषद घेत तेजप्रताप यांनी याबाबत घोषणा केली. यामुळे लालू प्रसाद यादव आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

लोक माझी थट्टा करायला मोकळे झाले आहेत, पमी माझ्या मार्गानेच चालेल. ही आघाडी सामाजिक न्याय, हक्क आणि बिहारचा कायापालट करण्यासाठी करण्यात आली आहे. जर बिहारच्या जनतेने आम्हाला बहुमत दिले, तर आम्ही राज्याच्या विकासासाठी काम करू. राम मनोहर लोहिया, कर्पूरी ठाकूर आणि जयप्रकाश नारायण यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करू, असे आश्वासन तेजप्रताप यादव आघाडीची घोषणा केल्यानंतर दिले. यावेळी त्यांनी महुआ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याचीही घोषणा केली.

तेजप्रताप यादव यांनी पुढील रणनीतीबाबत भूमिका मांडली तेव्हा आघाडी केलेल्या सर्वच पक्षांचे प्रमुख नेते मंचावर उपस्थित होते. अर्थात तेजप्रताप यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली असली तरी ही आघाडी राजदविरोधात उमेदवार रिंगणार उतरवणा का? याबाबत मोठी उत्सुकता आहे.