
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव एका भीषण अपघातातून थोडक्यात बचावले. मधेपुराहून पाटणाकडे येत असताना मध्यरात्रीच्या सुमारास एक भरधाव ट्रक तेजस्वी यादव यांच्या ताफ्यात घुसला आणि ताफ्यातील गाड्यांना उडवले. यात तीन सुरक्षा रक्षक जखमी झाले असून गाड्यांचेही मोठे नुकसान झाले. दैव बलवत्तर म्हणून तेजस्वी यादव यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास एनएच 22 वर हा अपघात झाला. मधेपुरा येथील एक कार्यक्रम आटोपून तेजस्वी यादव आपल्या ताफ्यासह पाटणाकडे येत होते. तेजस्वी यादव आणि राजदचे काही नेते राष्ट्रीय महामार्गावर चहा पिण्यासाठी थांबले होते, त्याचवेळी एक भरधाव ट्रकने ताफ्यातील गाड्यांना उडवले.
ट्रकच्या धडकेनंतर ताफ्यातील गाड्यांचे मोठे नुकसान झाले. हा अपघात झाला तेव्हा तेजस्वी यादव अवघ्या पाच फुटांवर उभे होते. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र त्यांच्या तीन सुरक्षा रक्षकांना दुखापत झाली असून त्यांना हाजीपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेजस्वी यादव यांनीही रुग्णालयात धाव घेत सुरक्षा रक्षकांच्या तब्येतीची विचारपूस केली.
थोडे इकडे तिकडे झाले असते तर…
या अपघाताबाबत माहिती देताना तेजस्वी यादव म्हणाले की, मधेपुरातील कार्यक्रम आटोपून परत येत असताना महामार्गावर आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो होतो. त्याचवेळी एका अनियंत्रित ट्रकने माझ्यासमोरच्या 2-3 गाड्यांना टक्कर दिली. सुरक्षा रक्षक तिथे उभे होते आणि ते या अपघातात जखमी झाले. माझ्यापासून अवघ्या 5 फुटांवर हा अपघात झाला. थोडे इकडे तिकडे झाले असते तर आम्हीही जखमी झालो असतो.
ट्रकचालक ताब्यात
दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले त्याचा ट्रकही जप्त केला. जितेंद्र कुमार असे ट्रकचालकाचे नाव आहे. या ट्रकचालकाचीही तेजस्वी यादव यांनी भेट घेतली.





























































