स्पर्धेदरम्यान औषधे टाळावीत, नेमबाज तेजस्विनी सावंतचे उद्गार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ कफसिरप या घटनेनंतर डोपिंग मुद्दा ऐरणीवर आलाय. यावर दैनिक ‘सामना’ने आंतरराष्ट्रीय मराठमोळी नेमबाज तेजस्विनी सावंत हिच्याशी बातचीत केली. याप्रसंगी ती म्हणाली, आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या एक महिनाआधी खेळाडूंनी औषधे टाळण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून त्यांना पुढे अडचणीचा सामना करावा लागणार नाही. स्पर्धेदरम्यान आजारी पडलात तर वाडा अधिकाऱयांचा सल्ला घेऊन उपचार करावेत, असेही ती पुढे म्हणाली.

कटाक्षाने नियम पाळते

अर्पणा पोपटचा डोपिंगचा किस्सा ऐकल्यानंतर मी स्पर्धेच्या एक महिनाआधी औषधे घेणे टाळते. किती व्यायाम करायला हवा, काय खायला हवे याबाबत कटाक्षाने नियम पाळते असे तेजस्विनी सावंत हिने आवर्जून सांगितले. यापुढे ती म्हणाली, प्रत्येक आंतरराष्ट्रीय खेळाडूला हेच सांगेन की, जास्तीत जास्त औषधे घेणे टाळा.

कोणताच तोटा नाही

प्रत्येक खेळाची संघटना वाडाच्या कक्षेत आहे तर मग बीसीसीआयने त्यांच्या कक्षेत यायला काय हरकत आहे? एखादी चांगली बाब घडत असेल, त्यामध्ये कोणताच तोटा होत नसेल तर बीसीसीआयने हे पाऊल उचलायला हवेच, असे तेजस्विनी सावंतला वाटते.

पृथ्वी यापुढे दक्ष राहील

पृथ्वी शॉ वयाने लहान आहे. त्याने हे मुद्दामहून केले नसेलच. चुकून त्याच्याकडून ही घटना घडली. कफ सिरपमध्ये उत्तेजके असेल हेही त्याला माहीत नसावे. पण यापुढे तो आणखी दक्ष राहील. अशी घटना पुढे घडणार नाही. प्रत्येक खेळातील खेळाडूंना मार्गदर्शनाची गरज आहे. संघटनांनी याकडे लक्ष द्यायला हवे. त्यानंतर भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, असे तेजस्विनी सावंतला वाटते.