फेक कॉल, मेसेज करणाऱ्यांवर कठोर कारवाई, 2.75 लाख मोबाईल नंबर ब्लॉक

फेक कॉल्स आणि मेसेजला आळा घालण्यासाठी दूरसंचार नियामकाने (ट्राय) कडक पावले उचलली आहेत. ट्रायने 2.75 लाख मोबाईल नंबर ब्लॉक केले. तसेच नोंदणीकृत नसलेल्या 50 टेलिमार्केटिंग कंपन्यांना ब्लॉक केले. ट्रायकडे जानेवारी ते जून 2024 दरम्यान 7 लाखांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारी फेक कॉल्स आणि स्पॅमसंबंधी आहेत. अलीकडच्या काळात त्रासदायक आणि अनावश्यक कॉल्सचे प्रमाण वाढले आहे. ‘ट्राय’कडे चालू वर्षाच्या सहामाहीत तब्बल 7.9 लाख दूरध्वनीधारकांच्या या संबंधाने तक्रारी आल्या आहेत. स्वच्छ आणि प्रभावी दूरसंचार परिसंस्था उभारण्यासाठी सर्वच घटकांनी योगदान देण्याची आवश्यकता आहे, असे ट्रायचे म्हणणे आहे.

1 ऑक्टोबरपर्यंत डेडलाईन

ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना जाहिरातपर मेसेज थांबवण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. त्यासाठी 1 सप्टेंबर ही डेडलाईन होती, ती आता वाढवून 1 ऑक्टोबर 2024 करण्यात आलेय. जर कुणी घटक स्पॅम कॉल करण्यासाठी आपल्या एसआयपी/ पीआरआय लायनींचा दुरुपयोग करत असतील, तर त्या घटकाला दिलेली सर्व दूरसंचार संसाधने कापून टाकून दोन वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी काळ्या यादीत टाकले जाईल.

95 टक्के लोक त्रस्त

देशात स्पॅम कॉल आणि मेसेजमुळे नागरिक त्रस्त आहेत. याविरोधात ट्रायकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीही स्पॅम कॉल्सचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. लोकल सर्कल्सच्या एका सर्वेनुसार, 95 टक्के हिंदुस्थानी दररोज फसवे कॉल आणि मेसेजमुळे त्रस्त आहेत. गेल्या सहा महिन्यांत अशा कॉल्सचे प्रमाण वाढले आहे. स्पॅमर्सही लोकांना नवनवीन पद्धतीन फसवत आहेत. सर्व्हेनुसार, 77 टक्के मोबाईल युजर्सना दिवसाला 3 स्पॅम कॉल येतात.