आमदार रेड्डी भाजपच्या वाटेवर! काँग्रेसपुढे नवे संकट

सामना प्रतिनिधीहैद्राबाद

तेलंगणामधील काँग्रेसचे 12 आमदार सत्तारुढ तेलंगणा राष्ट्र समिती पक्षात सामील झालेले असतानाच त्यांच्यासमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे. काँग्रेसचे आणखी एक आमदार के. राजगोपाल रेड्डी यांनीदेखील आपण भाजपची वाट धरू शकतो, असे संकेत दिले आहेत. नलगोंडाजवळील मुनुगोडे येथून काँग्रेसचे आमदार असलेले के. राजगोपाल रेड्डी यांनी पक्षाच्या अंतर्गत बाबींवर नाराजी व्यक्त करत टीआरएसशी मुकाबला करायला काँग्रेस सक्षम नाही, असा आरोप केला आहे.

के. राजगोपाल रेड्डी पुढे म्हणाले की, काँग्रेस केवळ तेलंगणामध्येच नव्हे, तर देशभरात कठीण परिस्थितीत आहे. देश भाजपच्या नेतृत्वाखालीच प्रगती करू शकेल. आजचा तरुण भाजपसोबत आहे. त्यात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या विरोधातील एक पर्याय म्हणून लोक भाजपकडेच पाहतात. दुसरीकडे काँग्रेसकडे प्रभावी नेतृत्वच नाही आणि पक्ष योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ शकत नाहीय, असेही रेड्डी यांनी स्पष्ट केले.