
मुंबई महानगरपालिका देवनार डंपिंग ग्राऊंड अदानीच्या घशात घालण्यासाठी स्वच्छतेवर तब्बल 23 कोटी 68 लाख रुपयांचा खर्च करणार आहे. यासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत. या कामात 110 हेक्टर जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून टाकलेला 185 लाख टन कचरा उचलला जाणार आहे. या जागेवर धारावीकरांचा विरोध असतानाही त्यांचे अदानीच्या माध्यमातून पुनर्वसन करण्याचा घाट घालण्यात आला आहे.
धारावीकरांच्या पुनर्विकासासाठी अदानीला मोक्याच्या जागा देण्याचा सपाटाच सरकारने लावला आहे. यामध्ये देवनार डंपिंग ग्राऊंडची जागाही अदानीला देण्यात येणार आहे. पालिका स्वखर्चाने ही जागा स्वच्छ करणार आहे.
असे होणार काम…
देवनार डंपिंग ग्राऊंड स्वच्छ करण्याच्या कामासाठी 185 लाख टन जुना कचरा उचलणे, विल्हेवाट लावणे असे काम केले जाणार असून 124 एकर जागेवर पुनर्वसन केले जाणार आहे. पावसाळ्याचा कालावधी धरून तीन वर्षांत हे काम पूर्ण केले जाणार आहे.
मुंबईकरांवर ‘अदानी करा’चा भुर्दंड कशासाठी?
पालिकेचे कर्तव्य असताना प्रशासनाकडून मुंबईकरांवर ‘कचरा कर’ लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर आता अदानी धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली 50 हजारांवर धारावीकरांना देवनार डंपिंग ग्राऊंडच्या जागी टाकणार आहे. मात्र ही जागा स्वच्छ करण्यासाठी मुंबईकरांकडून कररूपाने जमा झालेल्या पैशांमधून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना ‘अदानी करा’चा भुर्दंड कशासाठी, असा सवाल शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर उपस्थित केला आहे.