
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कामांसाठी काढलेल्या निविदांमध्ये मोठय़ा प्रमाणात घोटाळा होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनी आज केला. एमएमआरडीएची कोटय़वधींची कामे लाडक्या पंत्राटदारांना देण्याचा घाट घातला गेला असून एमएमआरडीए आयुक्तांनी हे वेळीच रोखले नाही तर त्याविरोधात लोकायुक्त आणि केंद्रीय दक्षता आयोगासह विधीमंडळातही आवाज उठवणार असा इशारा त्यांनी दिला.
अनिल परब यांनी यासंदर्भात एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांना पत्र लिहिले आहे. अटल सेतूवरील फायबर ऑप्टिक केबल, बीकेसी-चुनाभट्टी कनेक्टर आणि विक्रोळी येथील फूटओव्हर ब्रिज या प्रकल्पांच्या निविदांमध्ये मोठय़ा प्रमाणात अनियमितता होत असून त्यात तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.
विक्रोळी पादचारी पुलाची निविदा विशिष्ट कंपनीलाच देण्याच्या हालचाली
विक्रोळी येथील पादचारी पूल उभारणीसाठी काढण्यात आलेल्या निविदेचा अनिल परब यांनी पत्रात सविस्तर उल्लेख केला आहे. सुमारे 90 कोटी रुपयांच्या कामाची ही निविदा बंद होऊन दोन महिने उलटले तरी ती उघडली गेलेली नाही. आठ पंपन्यांनी ही निविदा भरली होती, मात्र दबाव टापून त्यातील सहा पंपन्यांना माघार घेण्यास भाग पाडले गेले. आता केवळ दोन पंपन्या उरल्या असून त्यातील एमएस स्पेको या पंपनीलाच हे काम देण्याचा घाट घातला गेला असल्याचे आमदार परब यांनी निदर्शनास आणून दिले आहे. ही निविदा सर्वांच्या उपस्थितीत पारदर्शकपणे उघडावी किंवा रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
…या प्रकल्पांच्या निविदांमध्ये अनियमितता
अटल सेतूवरील फायबर
ऑप्टिक केबल
बीकेसी-चुनाभट्टी कनेक्टर
विक्रोळीतील फूटओव्हर ब्रिज



























































