कश्मीरात वादळापूर्वीची शांतता, मोठ्या लढाईची तयारी

5491

सामना प्रतिनिधी । श्रीनगर

कलम 370 हटविल्यानंतर कश्मीर खोर्‍यात अद्याप तणावपूर्ण शांतता आहे. सोमवारी बकरी ईद शांततेत पार पडली. गोळीबाराची एकही घटना घडली नाही असे जम्मू-कश्मीर प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, कश्मीर खोर्‍यात मोठ्या हल्ल्याची तयारी फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांकडून सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

जम्मू-कश्मीरचे प्रधान सचिव रोहित कंसल यांनी सांगितले, ईदच्या दिवशी प्रशासनाने पूर्णपणे सावधगिरी बाळगली होती. राज्यात गोळीबाराच्या अफवा पसरविण्यात आल्या, पण किरकोळ अपवाद वगळता कुठेही गोळीबार झाला नाही. ईद शांततेत पार पडली.

प्रत्युत्तराची भाषा

दक्षिण कश्मीरातील सोपोर येथे तणाव आहे. दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांचा अड्डा मानण्यात येणार्‍या सोपोरमध्ये ईदच्या दिवशी घातपाती कारवाया होण्याची भीती होती, मात्र येथे सोमवारी शांतता होती. येथील फुटीरतावादी प्रत्युत्तराची भाषा बोलत आहेत. कश्मीरातील सध्याच्या घडामोडी पाहता आम्ही शांत आहोत असा गैरसमज करून घेऊ नये. ही आमची रणनीती आहे असे नुरबागच्या अल्ताफ अहमदने म्हटले आहे. नाझीर अहमद या फुटीरतावाद्यानेही सरकारकडून सुरू असलेल्या कारवाईला प्रत्युत्तर देऊ असे म्हटले आहे. बारामुल्लातील गुलाम हसनने युद्धाचे  फूत्कार सोडले आहेत. कश्मीर प्रश्नावर कायमचा तोडगा निघावा. संयुक्त राष्ट्रसंघात काही घडले नाही तर पाकिस्तानने हिंदुस्थानविरुद्ध युद्ध पुकारावे, त्याचे आम्ही स्वागत करू असे गुलाम हसनने म्हटले आहे.

आता युद्ध पुकारा

रोजच्या लढाईचा आता कंटाळा आला असून कश्मीर प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघावा. संयुक्त राष्ट्रात यावर काही घडले नाही तर पाकिस्तानने युद्ध पुकारावे, आम्ही त्याचे स्वागत करू, असे मत बारामुल्लातील नागरिक गुलाम हसन यांनी व्यक्त केले.

लडाख सीमेवर पाकची जमवाजमव

जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. हिंदुस्थानला संयुक्त राष्ट्रसंघ आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेरण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आता पाकिस्तानने लडाखला लागून असलेल्या पाकिस्तानी सीमेजवळ लढाऊ विमाने तैनात करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

पाकिस्तानी एअर फोर्सच्या सी-130 या मालवाहतूक करणार्‍या विमानांतून शनिवारी लडाखजवळच्या स्कारदू विमानतळावर लढाऊ विमानांना आवश्यक असलेले साहित्य उतरवले जात असून तिथे जेएफ-17 ही लढाऊ विमाने तैनात करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. हिंदुस्थानचे हवाई दल आणि सैन्य दल सगळ्या प्रकारच्या कुरापती मोडून काढायला सज्ज आहे. गुप्तचर यंत्रणा, उपग्रह पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे, असे हिंदुस्थानकडून स्पष्ट करण्यात आले.

हिंदुस्थानवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न  

पाकिस्तान आता लडाखजवळच्या सीमेवर लढाऊ विमाने आणून हिंदुस्थानवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. हिंदुस्थानच्या मते, पाकिस्तानी स्कारदूमध्ये लढाऊ विमाने तैनात करून तेथे युद्ध सरावही करू शकते. पाकिस्तानच्या रणनीतीचा हा एक भाग असू शकतो.

पाकिस्तान 15 ऑगस्ट ‘काळा दिन’ म्हणून साजरा करणार 

हिंदुस्थानात आणि जगभरातील हिंदुस्थानी स्वातंत्र्यदिन एखाद्या सणाप्रमाणे साजरा करतात; पण जम्मू-कश्मीरमधून 370 कलम काढून टाकल्यामुळे जळफळाट झाल्याने पाकिस्तानने आपल्या कुरापती सुरू केल्या आहेत. पाकिस्तानमध्ये 15 ऑगस्ट हा ‘काळा दिन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. पाकिस्तान सरकारने याबाबत एक पत्रकच जाहीर केले आहे. सॅटेलाइट टीव्ही चॅनेल्स, एफएम रेडिओ या सगळय़ांना ही सूचना पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. 15 ऑगस्टला कोणताही विशेष कार्यक्रम करायचा नाही. कश्मीरबद्दल आत्मीयता असलेल्या बातम्या आणि व्हिडीओंचे प्रसारण करायचे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या