
तेलंगणामध्ये मारवाडी, गुजराती व जैन समाजाच्या विरोधात स्थानिक भूमिपुत्रांचे आंदोलन पेटले आहे. मारवाडी व जैन समाजावर आर्थिक व व्यावसायिक दादागिरीचा आरोप करत स्थानिकांनी ‘मारवाडी गो बॅक’ अशी मोहीमच सुरू केली आहे.
सिकंदराबाद शहरात कार पार्किंगवरून काही जणांमध्ये वाद झाला. त्यावेळी मारवाडी व जैन समाजाच्या काही तरुणांनी जातीवरून हिणवत स्थानिक मुलांना मारहाण केली. तिथेच या वादाची ठिणगी पडली. ‘सिकंदराबादमध्ये घडलेली घटना एकमेव नाही. अशा अनेक घटना घडत आहेत. तेलुगू लोक पिऊन झोपतात, काम करत नाहीत अशी बदनामी हे लोक करत आहेत. मात्र आता आमचे लोक जागे झाले आहेत. मारवाडी, जैनांविरोधात सुरू झालेले आंदोलन उत्स्फूर्त आहे, असे पृथ्वीराज यांनी सांगितले. निवडणुकीच्या वेळी हे व्यापारी लोक राजकारण्यांना पैसा पुरवतात. छोट्या व्यावसायिकांना ते जमत नाही. त्यामुळे राजकारणीही मारवाडी, जैनांच्या दादागिरीकडे लक्ष देत नाहीत, असा आरोप पृथ्वीराज यांनी केला. आंदोलनामुळे हिंदूंमध्ये फूट पडत असल्याचा भाजपचा दावाही त्यांनी खोडून काढला. मारवाडी तरुणांनी ज्याला मारले तोही हिंदू होता. त्याला जातीवरून हिणवून मारले हे भाजपच्या लोकांना चालते का, असा सवालही त्यांनी केला.
व्यावसायिक व आर्थिक दादागिरी
‘व्यापारासाठी तेलंगणात आलेल्या मारवाडी व गुजराती समाजाची दादागिरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. देशभरात या लोकांची मोठी लॉबी आहे. दिल्लीपासून राजस्थान, गुजरात सगळीकडे यांची व्यावसायिक साखळी आहे. उत्पादन, वितरण, विक्री सगळे काही आपल्याच हातात ठेवतात. इतरांना बिझनेस करूच देत नाहीत. कोणी बिझनेस करत असेल तर त्याला संपवायची कारस्थाने करतात. कॉण्ट्रक्ट किलिंग करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. वारंगलमध्ये दोन वर्षांपूर्वी अशीच हत्या झाली होती. बहुतेक सगळे काळे धंदे मारवाडी, जैन यांचेच आहेत’ असा आरोप या आंदोलनाचे नेते संगम रेड्डी पृथ्वीराज यांनी केला.