
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये आधीच तणाव निर्माण झाला आहे. यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओतअफगाणिस्तानचे उप-गृहमंत्री मोहम्मद नबी ओमारी एका सरकारी कार्यक्रमात ‘ग्रेटर अफगाणिस्तान’चा नकाशा दाखवताना दिसत आहेत. हा कार्यक्रम २८ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानच्या सीमेजवळील अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतात पार पडला.
व्हायरल व्हिडीओत लष्करी गणवेश घातलेली दोन सैनिक मंत्र्यांना ढाल सादर करताना दिसत आहेत. ढालमध्ये अफगाणिस्तानचा नकाशा दर्शविला आहे, ज्यामध्ये खैबर पख्तूनख्वा, बलुचिस्तान आणि गिलगिट-बाल्टिस्तान या पाकिस्तानी प्रदेशांचा समावेश आहे. या नकाशाला ग्रेटर अफगाणिस्तान म्हटले जात आहे. दरम्यान, या व्हिडीओ समोर आल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.




























































