अयोध्या दहशतवाद्यांच्या रडारवर,सात पाकडय़ांची नेपाळमार्गे उत्तर प्रदेशमध्ये घुसखोरी

अयोध्या श्रीरामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालय पुढील सात दिवसांत कोणत्याही क्षणी देऊ शकते. या निकालाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अयोध्येला टार्गेट केले असून सात जण नेपाळमार्गे उत्तर प्रदेशमध्ये घुसल्याचे वृत्त आहे. याबाबत गुप्तचर यंत्रणेने ‘हाय अलर्ट’ जारी केला असून संभाव्य हल्ल्याचा कट उधळण्यासाठी देशातील सुरक्षा यंत्रणांनी जागता पहारा ठेवला आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई हे 17 नोव्हेंबरला सेवानिवृत्त होणार आहेत. अयोध्या खटल्याचा निकाल त्यांच्या निवृत्तीआधीच कोणत्याही क्षणी दिला जाण्याची शक्यता आहे. गुप्तचर यंत्रणेच्या इशाऱयानुसार सात पाकिस्तानी दहशतवादी अयोध्या, फैजाबाद आणि गोरखपूरमध्ये लपले आहेत. यातील पाच जणांची ओळख पटली असून मोहम्मद याकूब, अबु हमझा, मोहम्मद शाहबाझ, निसार अहमद आणि मोहम्मद कौमी चौधरी अशी त्यांची नावे आहेत. गुप्तचर यंत्रणेने या गुप्त माहितीची गंभीर दखल घेतली आहे. उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक ओ. पी. सिंग यांनी मात्र दहशतवाद्यांच्या घुसखोरीबाबत आपल्याला कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे सांगितले.

केंद्राने उत्तर प्रदेशमध्ये 4 हजार जवान पाठवले

केंद्र सरकारने केंद्रीय शस्त्र्ा पोलिस बलाचे चार हजार जवान उत्तर प्रदेशमध्ये पाठवले आहेत. गृह मंत्रालयाने सोमवारी यासंदर्भात निर्णय घेतला होता. यावेळी तातडीने निमलष्करी दलाच्या 15 तुकडय़ा पाठवण्यासही मंजुरी दिली होती. राज्यात बीएसएफ, आरएएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी आणि एसएसबीच्या तीन-तीन तुकडय़ा तैनात राहणार आहेत.

16 हजार स्वयंसेवकांचा सोशल मीडियावर वॉच

अयोध्या निकालाबाबत कोणीही भडकावू पोस्ट व्हायरल होऊ नये, या हेतूने सोशल मीडियावर वॉच ठेवण्यासाठी फैजाबाद पोलिसांनी 16 हजार स्वयंसेवकांची टीम कार्यरत ठेवली आहे. तसेच जिह्यातील 1600 ठिकाणांवर आणखी 16 हजार स्वयंसेवक तैनात ठेवले आहेत. या स्वयंसेवकांना स्वतंत्र व्हॉट्स ग्रुप्स बनवून सुरक्षेबाबत सूचना केल्या आहेत.

ऐतिहासिक निकाल…ऐतिहासिक खबरदारी…

अयोध्येचा निकाल ऐतिहासिक ठरणार असल्यामुळे सरकारने सुरक्षेचीही ऐतिहासिक व्यवस्था केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सर्वत्र कलम 144 लागू.

अयोध्येत येणाऱया सर्व रस्त्यांवर पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू.

जवळपास 128 अधिकारी अयोध्येत पोहोचले.

सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरे, श्वान पथके, एटीएस पथक, बीडीएस, एलआययू आदी सुरक्षा व्यवस्था सतर्क.

सर्व जिह्यांतील मंदिर आणि मशिदीमध्ये धार्मिक संघटना आणि समित्यांच्या शांततेसाठी बैठका.

 

आपली प्रतिक्रिया द्या