राजौरीत दहशतवादी हल्ला,लष्करी तळावर आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न उधळला; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-कश्मीरात राजौरी जिह्यातील लष्करी तळावर घुसून आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न करणाऱया दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यावेळी झालेल्या चकमकीत चार जवान शहीद झाले. सुभेदार राजेंद्र प्रसाद, रायफल मॅन मनोजकुमार,  लक्ष्मण डी. आणि  निशांत मलिक या चार जवानांना वीरमरण आले.

राजौरीपासून 25 कि.मी.वर परगल येथे हिंदुस्थानी लष्कराचे तळ आहे. आज पहाटे 3.30 च्या सुमारास दहशतवाद्यांनी लष्करी तळावर घुसण्याचा प्रयत्न केला. आत्मघाती हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. लष्कराच्या तळावरील गेटवर तैनात असलेल्या सतर्क जवानांनी दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावला.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट

हिंदुस्थानचा 75 वा स्वातंत्र्यदिन चार दिवसांवर आला असून, सुरक्षा दलाकडून अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून होणारा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी जम्मू-कश्मीरात ठिकठिकाणी कडेकोट सुरक्षा तैनात केली आहे. संवेदनशील भागात लष्करासह जम्मू-कश्मीर पोलिसांची गस्तही वाढवण्यात आली आहे.