कराचीत ‘पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज’वर दहशतवादी हल्ला; चार दहशतवादी ठार

पाकिस्तानातील कराचीत असलेल्या ‘पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज’वर सोमवारी सकाळी दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोनजणांचा मृत्यू झाला असून हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांनाही ठार करण्यात आले आहे. इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढण्यात येत असून जखमींना रुग्णालयात हलवण्यात येत आहे.

पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजमध्ये सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दोनजण आले. त्यांनी इमारतीत शिरण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकाने त्यांना मनाई करताच त्यांनी सुरक्षा रक्षकावर हँड ग्रेनेड फेकला आणि इमारतीत शिरले. त्यानंतर त्यांनी इमारतीत अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. या दहशतवादी हल्ल्यात दोनजणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी परिसराला घेराव घातला. इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढत त्यांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली. या कारवाईत हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांनाही ठार करण्यात आले आहे.

सुरक्षेच्या कराणासाठी इमारतीतून सर्वांना बाहेर काढून इमारत रिकामी करण्यात येत आहे. तसेच बॉम्बशोधक पथकालाही घटनास्थळी बोलवण्यात आले आहे. इमारतीत आणखी काहीजण अडकले असल्याची शक्यता आहे. त्यांना बाहेर काढण्यासोबतच जखमींना रुग्णालयात हलवण्यात येत आहे. जखमींमध्ये एका सुरक्षा रक्षकाचाही समावेश आहे. दहशतवादी हल्ला करण्यासाठी आलेल्या चारजणांना ठाक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. परिसरात नाकाबंदी करण्यात आली असल्याचेहबी पोलिसांनी सांगितले. सोमवारी कामकाजाचा पहिलाच दिवस असल्याने इमारतीत गर्दी असल्याचे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या