
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू कश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाला लक्ष्य केलं आहे. दक्षिण कश्मीरमध्ये मंगळवारी सकाळी दहशतवाद्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले केले. यात दोन पोलीस शहीद झाले असून ११ जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी पहिला हल्ला पुलवामा कोर्टाजवळील पोलीस चौकीवर केला. तर दूसरा हल्ला अनंतनाग येथे करण्यात आला. दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर ग्रेनेड फेकले. दरम्यान, या हल्ल्यानंतर पोलीस व सुरक्षा दलाने संयुक्त शोधमोहीम सुरू केली असून दहशतवाद्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.
पुलवामा येथे मंगळवारी पहाटे दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्हा मुख्यालयात नवीन कोर्ट कॉम्प्लॅक्सजवळील पोलीस चौकीवर ग्रेनेड फेकले. नंतर अंदाधुंद गोळीबार केला. यात दोन पोलीस शहीद झाले तर एकजण जखमी झाला आहे. त्यानंतर पोलीस व दहशतवादी यांच्यात २० मिनिटे चकमक सुरू होती. त्यानंतर दहशतवाद्यांनी तिथून पळ काढला. पण जाताना दहशतवाद्यांनी शहीद पोलिसांच्या हातातील रायफलीही पळवून नेल्या. गुलाम रसूल आणि गुलाम हसन अशी शहीद पोलिसांची नावे असून मंजूर अहमद असे जखमी पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे.
तर दुसरीकडे दक्षिण कश्मीरमधील अनंतनाग येथे दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात १० सीआरपीएफ कर्मचाऱ्यांसह ११ नागरिक जखमी झाले आहेत. हल्ला झाल्यानंतर दहशतवाद्यांना पळून जाता यावे म्हणून स्थानिकांनी जवानांवर दगडफेकही केली.

























































