28 ऑगस्टपासून दुसरी ते आठवीची पायाभूत चाचणी

सामना ऑनलाईन । मुंबई

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची चाचपणी करण्यासाठी दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी परीक्षा 28 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत ही परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 1 यावेळेत घेण्यात येईल. विद्यार्थ्यांची प्रगती किती झाली, तो कोणत्या विषयात मागे आहे हे तपासण्यासाठी पायाभूत चाचणी विद्या प्राधिकरणामार्फत घेण्यात येणार आहे. 28 आणि 29 ऑगस्टला दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची अनुक्रमे प्रथम भाषा आणि गणित विषयाची चाचणी होईल. त्यानंतर 30 ऑगस्टला तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची इंग्रजी (तृतीय भाषा) तर 31 ऑगस्टला सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची विज्ञानाची पायाभूत चाचणी पार पडणार आहे. परीक्षेच्या दिवशीच उत्तरपत्रिका तपासल्या जाव्यात अशी कोणतीही सक्ती शिक्षकांवर नाही. तसेच दोन सत्रांत भरणार्‍या शाळांमध्ये एकाच वेळेला परीक्षा घेण्यात यावी, अशा सूचना विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ.सुनील मगर यांनी दिली.