‘ठाकरे’चा उद्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

2649

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमाचा 26 जानेवारी रोजी कलर्स मराठी वाहिनीवर दुपारी 12 वाजता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर आहे.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची निर्मिती असलेल्या ‘ठाकरे’ सिनेमात अभिनेते नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारली आहे, तर अभिनेत्री अमृता राव हीने माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांची भूमिका केली आहे. अभिजित पानसे यांनी ‘ठाकरे’ सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

25 जानेवारी 2019 रोजी ‘ठाकरे’ हा सिनेमा महाराष्ट्रासह जगभरात प्रदर्शित झाला. ‘ठाकरे’ सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनापूर्वी सिनेमागृहांबाहेर हाऊसफुलचे फलक झळकले. बाळासाहेबांचे दमदार संवाद, जोशपूर्ण पार्श्वसंगीत आणि काळजाला भिडणारी गाणी यामुळे सर्वत्र बोलबाला दिसून आला तो ‘ठाकरे’ सिनेमाचाच! ‘व्यंगचित्रकार ते हिंदुस्थानचा महानेता’ हा बाळासाहेबांचा थक्क करणारा प्रवास पडद्यावर बघताना प्रेक्षक भारावून गेले. हाच अनुभव आता प्रेक्षकांना छोटय़ा पडद्यावर घेता येणार आहे.

यासंदर्भात वायकॉम 18 चे व्यवसाय प्रमुख निखिल साने म्हणाले, ‘महाराष्ट्रामध्ये अनेक थोर कर्तृत्ववान नेते होऊन गेले, त्यामधीलच सर्वात महत्त्वाचे नाव म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आणि म्हणूनच ‘ठाकरे’ हा मराठी सिनेमाच्या इतिहासातील महत्त्वाचा बायोपिक आहे. आम्ही आमचं भाग्य समजतो की, संजय राऊत आणि ठाकरे सिनेमाच्या संपूर्ण टीमसोबत काम करण्याची आम्हाला संधी मिळाली.’ संजय राऊत प्रस्तुत, राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी, वायकॉम 18 स्टुडिओज आणि कार्निवल मोशन पिक्चर्स निर्मित ‘ठाकरे’ सिनेमा रविवारी दुपारी 12 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर बघायला विसरू नका.

आपली प्रतिक्रिया द्या