उन्हाच्या नावाने ‘शिमगा’; चढता सूरज.. ठाणे ४०, रायगड ३८, पालघर ३८ तापमान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐन होळीच्या दिवसात उन्हाच्या नावाने ‘शिमगा’ सुरू झाला आहे. सूर्य आग ओकत असून तापमान रोज वाढत चालल्याने अंगाची लाहीलाही होण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे जिल्ह्याचे तापमान तर आज ४० डिग्रीवर जाऊन पोहोचले. रायगड व पालघर जिल्ह्यातही पारा ३८ वर गेला असून यंदाचा उन्हाळा कडक असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. चढता सूरज धीरे धीरे असला तरी लगबगीने घरातील एसी ऑन होऊ लागले आहेत. दरम्यान, दुपारच्या वेळेस रस्त्यांवर तुरळक गर्दी दिसत असून आईस्क्रीम, उसाचा रस, लिंबू सरबत, नारळाचे पाणी याची मागणी वाढली आहे.

मार्च महिना सुरू होऊन तीन दिवस उलटत नाही तोच ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढत चालला आहे. सोमवारी होळी पेटल्यानंतर मंगळवारी रात्रीपासूनच हवेत उष्णता वाढण्यास सुरुवात झाली असून आज सकाळी सवासातच्या सुमारास ठाणे शहरात २६ डिग्री एवढे तापमान होते. हे तापमान दुपारी पावणेतीनच्या सुमारास ४० वर गेले. रायगडातही पारा ३८ वर गेला असून पुढील दोन दिवसात तो ४० वर जाईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पालघर जिल्ह्यात ३८ च्याही वर आज तापमान होते, तर डहाणूमध्ये ३६.२ एवढा पारा दर्शवला गेला. पालघर जिल्ह्यात ठाणे, रायगडप्रमाणेच उष्णता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

रायगडातील उष्णतेचा आलेख
पनवेल ३७, उरण ३२, कर्जत ३७, खालापूर ३७, सुधागड ३६, पेण ३६, अलिबाग ३३, मुरुड ३४, रोहा ३६, तळा ३८, म्हसळा ३४, श्रीवर्धन ३४, माणगाव ३८, महाड ३७, पोलादपूर ३७.

ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये १० बेड राखीव
मार्च, एप्रिल, मे हे तीन महिने प्रचंड उष्णतेचे राहणार असून चक्कर येणे, शरीरातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित होणे, अतिसार आदींचा धोका आहे. उन्हाचा स्ट्रोक आलेल्या रुग्णांसाठी ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये १० विशेष बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यात आवश्यक ती औषधे, कूलिंग सेंटर व अन्य साधनेदेखील आहेत.