लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदारसंघात सुट्टीच्या दिवशी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबवली असून मतदार नोंदणीत वाढ झाली आहे. दरम्यान ठाण्यातील 18 विधानसभेच्या मतदारांची अंतिम यादी 30 ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघामधील मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरात नवीन मतदार नोंदणीसाठी एकूण 3 हजार 376 अर्ज प्राप्त झाले आहेत. मतदारयादीतून नाव वगळण्यासाठी 114 तर तपशील दुरुस्तीसाठी 583 अर्ज प्राप्त झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये एकही मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये म्हणून विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
मतदारयादीत नाव असल्याची खात्री करा
नवीन मतदार नोंदणीचे अर्ज ऑनलाइन तसेच सर्व मतदारसंघामध्ये स्वीकारण्यात येणार आहेत. पात्र नागरिकांनी आपले नाव मतदारयादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी अर्ज दाखल करावेत. तसेच मतदारांनी आपले व आपल्या कुटुंबीयांचे नाव मतदारयादीमध्ये असल्याची खात्री करण्याचे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे व ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी केले आहे.