निवडणूक संपली; वसुली जोरात सुरू, मालमत्ता करातून ठाणे पालिकेला लक्ष्मीदर्शन

महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपताच ठाणे पालिका प्रशासनाने थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी बिलांच्या वसुलीला जोरदार सुरुवात केली आहे. ठाणे महापालिकेचा आर्थिक गाडा रुळावर आणण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून तिजोरी भरण्यासाठी पालिकेने मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत मालमत्ता कर तब्बल ५७३ कोटी २५ लाख तर पाणीपट्टी केवळ ७३ कोटी १३ लाखांची वसुली झाली आहे.

ठाणे महापालिकेने २०२५-२६ या आथिर्क वर्षात मालमत्ता करांसाठी ९२० कोटी तर पाणीपट्टी करांसाठी २५० कोटी वसूल करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले होते. दरम्यान, पालिकेच्या एकूण नऊ प्रभाग समित्यांमध्ये माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक २२० कोटींची वसुली झाली, तर कळव्यात सर्वाधिक कमी म्हणजेच २४ कोटींचा मालमत्ता कर जमा झाला आहे. जकात आणि एल बीटीसारखे करवसुलीचे स्रोत बंद झाल्यानंतर मुख्य स्रोत मालमत्ता कर आहे. माल मत्ता तसेच पाणीपट्टी कराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासन मालमत्ता जप्तीसह पाणीपट्टी थकीत बिल धारकांचे नळ खंडित करणे, मीटर रूम सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

एकरकमी भरणा केल्यास सूट लागू

महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या पाणीपट्टी थकीत बिले चालू वर्षासह एकरकमी भरणा केल्यास दंड किंवा व्याजामध्ये १०० टक्के सूट लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन थकीत पाणी बिल भरावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

या सुविधांचा लाभ घ्या ! मालमत्ता करभरणा केंद्र सुट्टीच्या

दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच पालिकेच्या www.thanecity. gov.in या संकेतस्थळावरून पेमेंट गेट वेद्वारे ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुगल पे, फोन पे, पेटीएम, भीम अॅपद्वारेदेखील करदाते मालमत्ता कर भरण्यासाठी सुविधा दिली आहे.