मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली शहरांसह संपूर्ण एमएमआरडीए क्षेत्रातील इतिहासप्रेमींचे विशेष आकर्षण असलेला घोडबंदर किल्ला आता दारुडे, चरसी आणि गर्दुल्यांचा अड्डा बनला आहे. या किल्ल्याच्या संवर्धनासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी दिला होता. मात्र मीरा-भाईंदर महापालिका प्रशासनाने या निधीमधील एक रुपयाही खर्च केला नाही. त्यामुळे हा निधी गेली अनेक वर्षे धूळखात पडून आहे. किल्ल्यावर ठिकठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा आणि चरस, गांजाच्या पाकिटांचा खच पडला आहे. त्यामुळे दुर्गप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात असलेला घोडबंदर किल्ला सुमारे 800 वर्षापूर्वी बांधलेला आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पशनि पावन झालेल्या या किल्ल्याची नोंद केंद्रीय पुरातत्व विभाग, राज्य पुरातत्व आणि वास्तुसंग्रहालय विभागाच्या यादीत करण्यात आली आहे. हा किल्ला पाहण्यासाठी मुंबईसह राज्यभरातील दुर्गप्रेमी मोठ्या संख्येने येतात. मात्र किल्ल्यावर आल्यानंतर त्यांची निराशा होते. या किल्ल्याच्या संवर्धनासाठी मीरा-भाईंदर महापालिकेने कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही.
सुरक्षारक्षक नसल्यामुळे किल्ल्यावर दारुडे, प्रेमीयुगूल, चरसी, गर्दुल्ले यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोठा ऐतिसाहिक वारसा असलेल्या या किल्ल्यावर दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा सर्वत्र खच पडलेला आहे. हिंदुस्थानचा 78 वा स्वातंत्र्यदिन नुकताच साजरा झाला. या दिवशी महापालिका प्रशासनाने किल्ल्यावर कोणतीही विद्युतरोषणाई केलेली नाही. किल्ल्याची
महिलांची छेडछाड
ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याकडे महापालिका प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या किल्ल्यावर दारुडे, गर्दुल्ले, चरसी, प्रेमीयुगूल आणि टवाळखोरांचा वावर वाढला आहे. या दारुड्यांकडून आणि गर्दुल्यांकडून घोडबंदर गावातील महिलांची छेड काढल्याचे प्रकारही अनेक वेळा घडले आहेत. त्यामुळे या किल्ल्याच्या संवर्धनासाठी आवश्यक ती उपाययोजना पालिका प्रशासनाने तातडीने करावी, किल्ल्यावर सुरक्षारक्षक नेमण्यात यावेत आदी मागण्या दुर्गप्रेमी नागरिक आणि घोडबंदरवासीयांनी केली आहे.
दुर्गप्रेमींचे आंदोलन
घोडबंदर किल्ल्याचे चांगल्या पद्धतीने संवर्धन व्हावे यासाठी जंजीरे धारावी किल्ला जतन समितीच्या वतीने आज भाईंदरमधील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानात आंदोलन छेडण्यात आले. किल्ल्यावर येणाऱ्या दारुड्यांवर आणि गर्दुल्यांवर कारवाई करण्यात यावी, किल्ल्यावर सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात यावी, सुरक्षारक्षक नेमण्यात यावेत अशा मागण्या दुर्गप्रेमींनी केल्या आहे. या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या जिल्हा संघटक स्नेहल सावंत कल्सारिया, विभागप्रमुख विनोद म्हात्रे, शहर संघटक शिबानी देसाई, शाखाप्रमुख अमित सोनावणे, शाखा संघटक दर्शना सावंत, जंजीरे धारावी किल्ला जतन समितीचे अध्यक्ष श्रेयस सावंत, महासचिव रोहित सुवर्णा, सचिव मयूर ठाकूर, चेतन गायकवाड, विनोद देसाई, विलास खंडेराव, विशाल अग्रहनी आदी सहभागी झाले होते.