Thane crime news – मैत्रीचा बहाणा… स्टेशनवर बोलावून दोन लाख लुटले, कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मैत्रीचा बहाणा करून महिलेने एका ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला कर्जत रेल्वे स्थानकात बोलावले. नंतर आपल्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीने या ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण करून त्यांच्याकडील दोन लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लुटला. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नागपूर येथील सुनील गजघाटे (६१) यांना आदिती ढोके हिने मैत्रीचा बहाणा करून कर्जत रेल्वे स्थानकावर बोलावले. त्यानंतर तिने आपल्या दोन साथीदार सुशील व मंगेश यांच्या मदतीने सुनील क्राईम यांना पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून नेले. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन नंतर आपल्या राहत्या ठिकाणी डांबून ठेवले. या दरम्यान आरोपींनी त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या अंगावरील सोन्याची साखळी, दोन सोन्याच्या अंगठ्या, रोख रक्कम तसेच दोन मोबाईल असा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला.

४० हजार परस्पर लांबवले

पनवेल – बडोदा बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या श्रुती साखरे (२६) या तरुणीची एका भामट्याने फसवणूक केली आहे. या तरुणीच्या एटीएम कार्डचा वापर करून ४० हजार रुपये तिच्या खात्यातून परस्पर काढून घेतले आहेत. हा प्रकार श्रुतीच्या निदर्शनास आल्यानंतर तिने पनवेल शहर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार केली.

पनवेलमध्ये हुक्का विक्री

पनवेल तालुक्यातील मानघर येथील एका शेतघरात बेकायदेशीरपणे हुक्का विक्री सुरू असल्याचा प्रकार पनवेल शहर पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या शेतघरातून हुक्का ओढण्यासाठी वापरले जाणारे विविध साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय देवकाते यांच्या पथकाने केली आहे.

उरणमध्ये चार लाखांचे हेरॉईन जप्त

उरण पोलिसांनी धुतूम परिसरात एका तस्करावर झडप घालून त्यांच्याकडून दहा ग्रॅम हेरॉईन हस्तगत केले आहे. या हेरॉईनची किंमत सुमारे ४ लाख ७ हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी पोलिसांनी जहेदूर शेख याला अटक केली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहेत. धुतूम परिसरात एक तस्कर अमली पदार्थ विक्री करीत असल्याची माहिती उरण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या भागातील गस्त वाढवली. संध्याकाळच्या साडेसहाच्या सुमारास चिलें ते धुतूम गावातील रोडवरील भवानी पेट्रोल पंपदरम्यानच्या आई एकविरा ढाब्याजवळ आरोपी जहेदूर शेख (३५) हा इसम संशयितरीत्या फिरताना दिसला. त्याच्या संशयित हालचालींची दखल घेत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत ४ लाख ७ हजार ६०० रुपये किमतीचे १०.१९ ग्रॅम हेरॉईन आढळून आले. पुढील तपास उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल काटवाणी, संजय राठोड करीत आहेत.