गडकरी रंगायतनचा ‘स्वातंत्र्य दिन’; 15 ऑगस्टला पडदा उघडणार

ठाणे शहराचा सांस्पृतिक मानबिंदू आणि ठाणेकरांच्या मर्मबंधातली ठेव असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतनचे काम पूर्ण झाले असून या नाटय़गृहाचा पडदा तब्बल दहा महिन्यांनंतर स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला उघडणार आहे. शासनाच्या 31 कोटींच्या निधीतून या नाटय़गृहाचे रूपडे पूर्णपणे बदलण्यात आले आहे. आधुनिक स्वरूपात रसिकांच्या सेवेत रुजू होणाऱया या नाटय़गृहात पुन्हा कलावंतांचा मेळा भरणार असून ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत नव्याने साकारलेल्या रंगायतनचे लोकार्पण होणार आहे.

दुरुस्ती आणि रंगरंगोटीसाठी गडकरी रंगायतन ऑक्टोबर 2024पासून बंद होते. त्यामुळे रसिकांचा हिरमोड झाला होता. परंतु नव्याने साकारलेल्या रंगायतनमध्ये आधुनिक पद्धतीच्या यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. इमारतीची संपूर्ण स्ट्रक्चरल दुरुस्ती करण्यात आली असून छतावर नवीन शेड घालण्यात आली आहे. फ्लोअरिंग नवीन करण्यात आले आहे. रंगमंचाचे नूतनीकरण करण्यात आले असून नवीन खुर्च्या, नवे फॉलसिलिंग, नवे अॅकोस्टिक पॅनल, अग्निशमन यंत्रणा, गालिचे, फर्निचर, विद्युत रचना, ट्रान्सफॉर्मर, जनरेटर आदी व्यवस्था करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांसाठी नव्या लिफ्टही बसवण्यात आल्या आहेत.

शिवसेनाप्रमुखांनी ठाणेकरांना दिलेली भेट

ठाणेकरांनी शिवसेनेला पहिली सत्ता दिल्यानंतर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणेकरांना राम गणेश गडकरी रंगायतन या पहिल्या नाटय़गृहाची भेट दिली. 1978मध्ये बांधण्यात आलेल्या रंगायतनची 1998मध्ये प्रथमच दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता 26 वर्षांनी नूतनीकरण करण्यात आले आहे. ऑक्टोबर 2024मध्ये नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले.

  • ‘गडकरी कट्टा ही रंगायतनची खरी शान आहे. अनेक ज्येष्ठ कलावंत याच कट्टय़ावरून घडले व नवोदित कलावंत घडत आहेत. त्यामुळे कट्टय़ाची ओळख प्रशासनाने तशीच ठेवली आहे.
  • प्रवेशद्वाराशेजारील भिंतीवर शहरातील नामवंत नाटय़कर्मींची छायाचित्रे व माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. रंगकर्मी श्याम फडके, शशी जोशी, चंदू पारखी, जयंत सावरकर यांच्यासह ज्येष्ठ रंगकर्मींचा समावेश यामध्ये असणार आहे.

आसन क्षमता दोनशेने कमी झाली

नूतनीकरणानंतर नाटय़गृहाची आसन क्षमता दोनशेने कमी झाली आहे. आता 850 इतकी आसन व्यवस्थाच असणार आहे. त्यामुळे निर्मात्यांना आर्थिक फटका बसणार असला तरी प्रेक्षकांना मात्र वावरण्यास सुटसुटीत जागा उपलब्ध झाली आहे.