ठाण्यातील रुग्णालयात मुंब्र्यातील 29 रुग्णांचे डायलिसिस; गोरगरीब रुग्णांना दिलासा

376

मुंब्र्यातील काळसेकर रुग्णालय बंद असल्याने शुक्रवारी ठाण्यातील महापालिकेच्या हिरानंदानी येथील डायलिसिस सेंटर येथे सकाळपासून 20 तर हाजुरी येथील जितो रुग्णालयात 9 अशा एकूण 29 रुग्णांवर डायलिसिस करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द माळगावकर यांनी दिली. शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर नरेश म्हस्के व राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांच्या प्रयत्नाने तातडीने ठाण्यात डायलेसीस सेंटर सुरू केल्यामुळे चिंताग्रस्त रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे मुंब्र्यातील काळसेकर रुग्णालय बंद करण्यात आले आहे. या रुगणालयात गरीब व गरजू रुग्ण डायलिसिससाठी येत होते. मात्र रुग्णालय बंद केल्याने रुग्णांमध्ये चिंतेचे वातावरण होते. ही बाब समजताच महापौर नरेश म्हस्के, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांनी महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुध्द माळगावकर, डॉ. आर. टी केंद्रे, उपायुक्त संदीप माळवी, मनिष जोशी यांच्यासोबत तातडीची बैठक घेत ठाण्यातील रुग्णालयात डायलिसिस सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या होत्या.

काळसेकर रुग्णालयातून डायलेसिसच्या रुग्णांची यादी घेऊन महापालिकेने या रुग्णांना रुगणवाहिकेतून आणून डायलिसिस झाल्यानंतर पुन्हा घरी सोडण्यात आले. शुक्रवारी एकूण 29 रुग्णांवर डायलेसीस करण्यात आल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे. तसेच दररोज गरजू रुग्णांवर डायलिसिस करण्यात येणार आहे. सध्या कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सर्वच डॉक्टर लढत आहे, या परिस्थीतीत डायलिसिस रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेत तातडीने ठाण्यातील रुग्णालयात व्यवस्था केल्याबद्दल महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुध्द माळगावकर, डॉ. आर.टी. केंद्रे, जितो रुग्णालयाचे महेंद्र जैन यांचे आभार मानले.

आपली प्रतिक्रिया द्या