ठाण्यातील कोपरी येथे असलेल्या 828 कुटुंबांवर मृत्यूची टांगती तलवार आहे. अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी आम्हाला खासगी बिल्डर हवा तर काही जणांनी आमचे क्लस्टरमधूनच पुनर्वसन करावे, अशी मागणी केली आहे. परंतु या वादामुळे सिंधी कॉलनीमधील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला असून कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने एखादी दुर्घटना घडल्यास मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
■ हिंदुस्थान-पाकिस्तान फाळणीच्या वेळी ठाणे पूर्वेकडील कोपरी भागात साधू वासवानीनगरमध्ये 25 इमारतींची सिंधी कॉलनी वसवण्यात आली होती. इमारतीच्या बांधकामाला 72 वर्षे झाल्याने ठाणे महापालिकेने स्ट्रक्चरल ऑडिट करून काही इमारती अतिधोकादायक ठरवल्या आहेत.
■ इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना नोटिसादेखील बजावण्यात आल्या आहेत. मात्र पालिकेला न जुमानता आजही अनेक कुटुंबे वास्तव्य करीत आहेत.
■ यासंदर्भात उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर व्हिला 16 को. ऑप. गृहनिर्माण सोसायटीच्या शिष्टमंडळाने नुकतीच पालिका आयुक्तांची भेट घेऊन इमारतीवर कार्यवाहीची मागणी केली.
■ पालिका मात्र केवळ कागदी घोडे नाचवून टोलवाटोलवी करीत असल्याने एखादी दुर्घटना घडल्यास कोण जवाबदार, असा सवाल याचिकाकर्ते यांनी उपस्थित केला.
रहिवाशांमध्ये वादाचे इमले
सिंधी कॉलनीतील एका इमारतीमधील 36 पैकी 21 कुटुंबांनी घरे रिकामी केली. परंतु पालिकेने वारंवार नोटीस बजावूनही उर्वरित कुटुंबे या अतिधोकादायक इमारतीत वास्तव्य करीत आहेत. दरम्यान पुनर्विकासाच्या वादातून रहिवाशांमध्ये दुफळी पडली आहे. रहिवाशांमध्ये फूट पडल्याने या इमारतीच्या पुनर्विकासाचे घोंगडे भिजत पडले असून वादाचे इमले उभे राहिले आहेत.
विकासकाला कडाडून विरोध
खासगी विकासकाकडून रहिवाशांची फसवणूक होत आहे. त्यामुळे क्लस्टरमधून इमारतींचा विकास व्हावा, अशी आमची मागणी आहे. नीलेश अहिरे, स्थानिक रहिवासी सिंधी कॉलनीतील व्हिला 16 को. ऑप. गृहनिर्माण सोसायटीच्या पुनर्विकासाचा सर्वानुमते नोंदणीकृत करार 2016 मध्ये शुभम डेव्हलपर्स यांच्यासमवेत झाला. रहिवाशांना दरमहा भाडेही मिळत आहे. मात्र तळमजल्यावरील कुटुंबांच्या आडमुठे धोरणामुळे पुनर्विकास रखडल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. दरम्यान काही कुटुंबांनी शुभम डेव्हलपर्स या विकासकाला विरोध दर्शवला असून क्लस्टरमधून पुनर्विकासाचा आग्रह धरला आहे.