लाडकी बहीण योजनेचे ढिंढोरे पिटणाऱ्या मिंधे सरकारला आज भाईंदरमधील बहिणींनीच सणसणीत चपराक लगावली. तुमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घ्या आणि आम्हाला तुमचे पैसे नकोत सुरक्षा द्या, असे या महिलांनी ठणकावत त्यांनी तहसीलदारांच्या टेबलावर तीन हजार रुपयांचा नोटा भिरकावल्या.
कोपरखैरणे, शिळफाटा, उरणपाठोपाठ बदलापुरात दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे अवघ्या महाराष्ट्रात जनप्रक्षोभ उसळला आहे. विशेषतः महिला वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. नुसत्या लाडक्या बहीण योजनेचे ढिंढोरे पिटून पैसे वाटत जाहिरातबाजी करू नका तर लाडकी बहीण योजनेपेक्षा ‘सुरक्षित बहीण’ हवी, अशी मागणी महिला वर्गातून होऊ लागली आहे. आज दुपारी काही महिला तहसीलदार कार्यालयात आल्या. त्यावेळी तहसीलदार तेथे नव्हते. मात्र अव्वल कारकून नीलेश भोसले उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ‘लाडकी बहीण’ योजनेचे तीन हजार रुपये दिले आहेत. ते तीन हजार रुपये आम्हाला नकोत, आम्हाला सुरक्षा हवी आहे ती आधी द्या. पैसे नको न्याय द्या, असे सांगत या महिलांनी तहसीलदारांच्या टेबलावर तीन हजार रुपयांच्या नोटा भिरकावल्या.
View this post on Instagram
महिलांच्या या आंदोलनामुळे तहसीलदार कार्यालयात कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. या घटनेचा व्हिडीओ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्स प्रसारमाध्यमावर व्हायरल केला आहे.
“लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घ्या. आम्हाला सुरक्षा हवी!”
“लाडकी बहीण सुरक्षित योजना” pic.twitter.com/uLtQl0KOSm
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 22, 2024