
धोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन राहणाऱया लाखो ठाणेकरांना हक्काचे मोफत घर देणाऱया क्लस्टर योजनेचा सर्व अडथळा दूर झाला आहे. या योजनेच्या माध्यमातून 300 चौरस फुटांपर्यंतच्या घरात राहणाऱयांना तितक्याच आकाराचे घर मिळणार आहेच, पण त्यापेक्षा मोठय़ा घरात राहणाऱयांना 25 टक्के जादा एफएसआयही मिळणार असल्याची ग्वाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाण्यात दिली.
ठाण्यात महापालिका मुख्यालयाजवळ झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेत ठाणे जिह्यात सुरू असलेल्या विकासभरारीची स्तुती केली. शहरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून साडेपाचशे कोटींची विकासकामे सुरू आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.
ठाणे मेट्रो उल्हासनगरपर्यंत
मुख्यमंत्री म्हणाले की, येत्या पाच वर्षांत उल्हासनगरात अनेक प्रकल्प येणार असून संपूर्ण रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येईल. तसेच इमारतींसाठी चार एफएसआय दिला जाणार आहे. विशेष म्हणजे शहरात मेट्रोचे जाळे निर्माण करणार असून स्थानकाला सिंधूनगर असे नाव दिले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
पीएमसी खातेदारांनी पोस्टर्स फडकवले
सभेनंतर पीएमसी खातेदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पोस्टर्स फडकवून आम्हाला दिवाळीची भेट म्हणून आमचे पैसे परत द्या, घोटाळेबाजांवर कारवाई करा अशी मागणी केली. या आंदोलनाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेऊन कारवाईचे आश्वासन दिले.



























































