दुसऱ्यांच्या नावे धनादेश देऊन व्यापाऱ्यांना गंडा, ठाण्यातल्या भामट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

व्यापाऱ्यांकडे जायचे, त्यांच्यावर छाप पडेल असा रुबाब दाखवायचा, मग मोठय़ा संख्येने वस्तू अथवा साहित्याची ऑर्डर द्यायची. ठरल्याप्रमाणे माल ताब्यात घेऊन व्यापाऱ्याच्या हातात कोणाच्याही बंद झालेल्या बँक खात्याचा धनादेश ठेवायचा आणि पसार व्हायचे. अशा प्रकारे व्यापाऱ्यांना पद्धतशीर गंडा घालणाऱ्या ठाण्यातील एका भामट्याच्या व्ही.पी. रोड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

गिरगाव येथे मार्बल विक्रीचा व्यवसाय करणारा विराज जैन याच्याकडे एक ग्राहक आला व त्याने आपण एका धर्मादाय ट्रस्टचे ट्रस्टी असल्याची ओळख सांगून आपल्या मिठ्ठास वाणीने विराजवर छाप पाडली. मग विराजच्या डंकन रोड येथील दुकानातून ट्रस्टच्या खोल्यांमध्ये पाणी गरम करणारे रॅकोल्ड कंपनीचे 31 गिझर खरेदी केले. हे गिझर टॅक्सीत भरून तो दादरपर्यंत आला. मग दादरला टॅक्सी थांबवून सर्व गिझर एका टेम्पोत ठेवले आणि टॅक्सीवाल्याकडे विराजला देण्यासाठी दोन धनादेश दिले. ती व्यक्ती गिझर घेऊन गेली. पण त्याने दिलेले धनादेश हे पनवेल येथील कंपनीचे असल्याचे आढळून आले. त्यामुळे विराज जैन याने व्ही.पी. रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल गायकवाड व पथकाने तपास सुरू केला.

हो दोन खोल्या सोडून राहतात
गायकवाड व त्यांच्या पथकाने त्या बँक खाते बंद असलेल्या धनादेशांची माहिती काढली असता ते धनादेश हरवल्याने बँक खाते बंद केल्याचे संबंधित कंपनीकडून सांगण्यात आले. पथकाने तांत्रिक बाबींच्या आधारे माग घेतला असता आरोपीचे लोकेशन वर्तक नगर परिसरात असल्याचे आढळून आले. पथकाने वर्तक नगर गाठले; पण भामट्याचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर परिसरात आरोपीचा पह्टो दाखवून शोध घेत असता एका तरुणीने ते माझ्या मैत्रिणीचे वडील असून दोन खोल्या सोडून राहतात असे सांगताच पोलिसांनी भरत निमावत या आरोपीला पकडले.