मुलांच्या शिक्षणासाठी आई बनली चोर, लोकलमध्ये चेन हिसकावली

पतीने दुसरे लग्न केले.. अन् संसार उघड्यावर पडला.. पदरात असलेल्या चार लेकरांचे संगोपन करायचे कसे, असा प्रश्न तिला पडला. यातूनच तिने मुलांच्या शिक्षणासाठी चोरीचा मार्ग स्वीकारला. राणी भोसले असे या आईचे नाव असून तिने मुलाच्या कॉलेजची फी भरण्यासाठी लोकलमधील महिला प्रवाशाची चेन हिसकावली. मात्र कल्याण रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने तपास करून तिला विठ्ठलवाडी परिसरातून अटक केली. तिच्याकडून पोलिसांनी चोरलेली चेन जप्त केली.

संभाजीनगर येथे राहणाऱ्या राणी भोसले यांच्या पतीने काही वर्षांपूर्वी दुसरे लग्न केले. त्यानंतर त्या चार मुलांना घेऊन अलिप्त राहू लागल्या. आपल्या चार मुलांचा उदरनिर्वाह आणि शिक्षणासाठी या मातेने मिळेल ते काम केले. मात्र पैशांची चणचण भासत असतानाच तिला आजारपण जडले. उपचारासाठी पैसे नसल्याने ती विठ्ठलवाडी येथे असलेल्या भावाच्या घरी राहण्यासाठी आली. दरम्यान उपचारासाठी मुंबईच्या दिशेने प्रवास करताना तिला 12 वीत शिक्षण घेणाऱ्या मुलाने फोन करून कॉलेजची फी भरली नाही तर कॉलेजमधून काढून टाकतील असे सांगितले. त्यानंतर तिने पैशांसाठी धावत्या लोकलमधील गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने मागोवा घेत तिला विठ्ठलवाडी येथील भावाच्या घरातून अटक केली.