ओळखपत्र, गणवेश बंधनकारक; नागरिकांशी सौजन्याने वागा, ठाणे महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे

विविध प्रकारच्या कामांसाठी सर्वसामान्य नागरिक ठाणे महानगरपालिकेची पायरी चढतात तेव्हा त्यांना अनेकदा वाईट अनुभव येतो. अधिकारी, कर्मचारी उद्धटपणे बोलतात. आता पालिकेच्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकरच शिस्तीचे धडे दिले जाणार आहेत. त्यात ओळखपत्र तसेच गणवेश बंधनकारक केले असून नागरिकांशी सौजन्याने वागा असे स्पष्ट आदेशही देण्यात आले आहेत.

पालिकेच्या कामकाजातील वाढता ढिसाळपणाविरोधात काँग्रेसने मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे निवेदन देत पाठपुरावा केला होता. अधिकारी कार्यालयात वेळेत उपलब्ध नसणे, भेट मिळाल्यास नागरिकांचे म्हणणे न ऐकणे, तसेच प्रशासकीय माहिती वेबसाईटवर आणि दर्शनी भागात न लावणे या तक्रारी सातत्याने वाढत होत्या. या सर्व प्रकरणांबाबत पिंगळे यांनी तक्रार केली होती. त्याची दखल घेत अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी मान्य करत कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

  • प्रशासकीय माहिती वेबसाईटवर स्पष्टपणे प्रकाशित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
  • अभ्यागतांसाठी अधिकाऱ्यांनी निश्चित भेटीची वेळ कार्यालयाबाहेरील फल कावर नमूद करण्यात येणार आहे.
  • नागरिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून त्यांना पुरेसा वेळ देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  • कार्यालयातून बाहेर जाताना एसी, पंखे आणि दिवे बंद ठेवण्याचे निर्देश परिपत्रकात समाविष्ट आहेत.