ठाणे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये होणार डायलिसिस उपचार; शेकडो रुग्णांना दिलासा

345

सुरक्षेच्या कारणामुळे मुंब्रा येथील काळसेकर रुग्णालय बंद करण्यात आले आहे. त्यामुळे येथे डायलिसिससाठी येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे आता ठाणे महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये डायलिसिस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेकडो रुग्णांना दिलासा मिळाला असून ठाणे महानगरपालिका रुग्णाला घरातून आणण्यापासून पुन्हा घरी पोहचवण्याचीही सेवा देणार आहे.

काही रुग्णालयात कोरोना संशयित आणि कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने ही रुग्णालये सुरक्षिततेच्या कारणाने बंद करण्यात आली आहेत. यामध्ये मुंब्रा येथील काळसेकर रुग्णालयाचा समावेश आहे. त्यामुळे या रुग्णालयात डायलिसिससाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे. ही बाब शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने डायलिसिसच्या रुग्णांची पर्यायी व्यवस्था महापालिकेच्यातर्फे करण्याचे आदेश वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. मुंब्रा येथील काळसेकर रुग्णालयात दररोज 50 हून अधिक रुग्णांचे डायलिसिस करण्यात येते. येथे उपचार घेणारे रुग्ण गरीब व गरजू असल्यामुळे त्यांना इतर रुग्णालयात उपचार घेणे आर्थिकदृष्टया परवडणारे नाही. याबाबत महापौर नरेश म्हस्के यांच्या दालनात गुरुवारी बैठक घेण्यात आली. या वेळी ठाण्यातील महापालिकेचे वाडिया हॉस्पीटल, कोपरी येथील लखीमचंद फतिमचंद रुग्णालय तसेच हाजुरी येथील जितो रुग्णालय येथे डायलिसीस उपचार करण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.

रुग्णांची यादी मागवली

काळसेकर रुग्णालयातून डायलिसिससाठी येणाऱ्या रुग्णांची यादी मागविण्यात आली असून त्यानुसार दररोज महापालिकेच्या आरोग्य विभागातून या रुग्णांशी संपर्क साधून त्यांचे डायलिसिस केले जाणार आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून त्या रुग्णाला घरापासून थेट रुग्णालयात नेले जाणार आहे. तसेच डायलिसिसनंतर पुन्हा घरी सोडले जाणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

महापौरांचे आवाहन

काळसेकर रुग्णालयात सध्या उपचार घेत असलेल्या डायलिसिस रुग्णांनी घाबरुन न जाता महापालिकेने सुरू केलेल्या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांनी केले आहे. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द माळगांवकर, डॉ.आर.टी. केंद्रे आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या