खेळाच्या मैदानावर उद्यान उभारण्याचा ठाणे पालिकेचा घाट; शिवसेनेने केली पोलखोल

इंदिरानगरच्या रुपादेवी मंदिर परिसरात असलेल्या खेळाच्या मैदानावर उद्यान उभारण्याचा घाट ठाणे पालिकेने घातला आहे. आधीच मुलांना खेळाची मैदाने कमी असताना रुपादेवी मैदानावर उद्यान उभारून कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपव्यय सुरू असल्याची पोलखोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रतिक राणे यांनी केली. स्थानिक नागरिकांचादेखील या कामाला विरोध असताना उद्यान बांधायचा घाट का? असा जाब राणे यांनी आज पालिकेच्या सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनसोडे यांना विचारला.

ठाण्यातील प्रभाग क्रमांक १५ मधील रुपादेवी मंदिर येथे गेल्या २० वर्षांपासून खेळाचे भव्य मैदान आहे. या भागात आजूबाजूच्या परिसरातील खेळाडू खेळतात. मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी कामे दाखवायची म्हणून चक्क मैदान उद्ध्वस्त करून उद्यान बांधायचे काम पालिकेने हाती घेतले आहे. या उद्यान उभारणीला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत उद्यान होऊ देणार नाही असा इशारा यावेळी संतप्त नागरिकांनी दिला आहे. यावेळी शहर उपसंघटक कांता पाटील, उत्तर भारतीय महिला संघटक मंजू उपाध्याय, उपविभागप्रमुख श्रीधर सकपाळ, शाखाप्रमुख उत्तम सूर्यवंशी, अशोक पवार व उपविभाग संघटक सोनी गिरी उपस्थित होते.

करदात्यांच्या निधीचा योग्य वापर करा
रुपादेवी प्रभागातील पार्किंगची मुख्य समस्या आहे. ही समस्या लक्षात घेता मैदानामध्ये भूमिगत वाहनतळ्ळ तयार करून त्यावर मैदानी खेळ खेळण्यासाठी उच्च दर्जाचे मैदान व मोफत अभ्यासिका निर्माण करा. ठाणेकर करदात्यांच्या निधीचा योग्य वापर करावा, जेणेकरून स्थानिक मुला-मुलींच्या कलागुणात भर पडेल अशी सूचना यावेळी शिवसेनेचे विभागप्रमुख प्रतिक राणे यांनी प्रशासनाला केली.