
<<< शाम धुमाळ >>>
वाढत्या अपघातांच्या मालिकांमुळे मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे. या महामार्गावर आठ महिन्यांत 23 अपघात झाले असून या अपघातात आतापर्यंत 24 जणांचा बळी गेला आहे. तर 30 ते 35 जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. समृद्धी महामार्गावरील गैरसोयीमुळे सर्वाधिक अपघात होत आहेत. मात्र त्रुटी दूर करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे 5 जून 2025 रोजी उद्घाटन झाले. मात्र अपुऱ्या सुविधा व अनेक त्रुटी असलेल्या या समृद्धी महामार्गावर पहिल्या दिवसापासून अपघातांचे सत्र सुरू आहे. जून 2025 ते 30 जानेवारी 2026 या आठ महिन्यांत इगतपुरी ते आमने यादरम्यान 24 मोठे तर 20 किरकोळ आपघात झाले आहेत. या अपघातात 24 प्रवाशांना जीव गमवावा लागला. तर 30 ते 35 आपघातग्रस्तांना अपंगत्व आले. समृद्धी महामार्ग हा पूर्णतः सिमेंट काँक्रीटचा असल्याने रस्ता कायम गरम असतो. रस्ता गरम व गाडीचे टायरही गरम होत असल्याने टायर फुटून अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत.
रुग्णालय गाठण्यासाठी 15 किलोमीटरचा फेरा
समृद्धी महामार्गावर अपघातग्रस्तांना कोणत्याही प्रकारची मदत टोल प्रशासन किंवा समृद्धी महामार्ग व्यवस्थापन यांच्याकडून मिळत नाही. अपघातग्रस्तांना प्राथमिक उपचार करणे किंवा रुग्णालयात घेऊन जाणे या सर्व बाबींना विलंब होतो. अपघातग्रस्तांवर वैद्यकीय उपचार वेळेवर होत नसल्याने त्याला मृत्यूला सामोरे जावे लागते. इगतपुरी ते आमने यादरम्यान अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना रुग्णालयात घेऊन जाण्यास दहा ते पंधरा किलोमीटरचा फेरा मारावा लागतो.
समृद्धी महामार्गावर आमने ते सिन्नर या 120 किलोमीटरच्या अंतरावर हॉटेल, पेट्रोल पंप, गॅरेज यांसह क्रेन, रुग्णालय आदी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा नाहीत. इगतपुरी ते आमनेदरम्यान पिंपरी आणि खुंटघर हे दोनच एक्झिट आहेत. हे एक्झिट कुचकामी आहेत. कसारा येथे एक्झिट पॉइंट केल्यास अपघातग्रस्तांना आपत्कालीन मदत मिळेल. महामार्गावरील इगतपुरी ते कसारादरम्यान व कसारा ते आमनेदरम्यान रस्त्यामध्ये एक इंचाचे गॅप असल्यामुळे वाहने जोरदार आदळतात. परिणामी अपघाताला निमंत्रण मिळते.



























































