
इमारतीचे क्लस्टर करण्यासाठी ठाण्याच्या वसंत विहार येथील जवाहरनगरमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत तुफान राडा झाल्याचे समोर आले आहे. यावेळी पिता-पुत्रासह अन्य दोघांना लाथाबुक्क्यांनी तुडवण्यात आले असून ते गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून ठाणे शहरात क्लटर योजनेचे वादळ घोंगावत आहे. अद्याप तरी या योजनेचा थेट लाभ नागरिकांना झालेला नाही. तसेच अनेक ठिकाणी या योजनेला विरोध होत आहे. दरम्यान जवाहरनगर परिसरामध्ये पुनर्विकासबाबत निखिल डेव्हलपर्स यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक सकाळी ११ वाजता सुरू झाली, बैठकीत जवळपास १०० स्थानिक नागरिक आणि सदस्य उपस्थित होते. क्लस्टर डेव्हलपमेंट राबवण्याबाबत जवाहर नगर येथील काही रहिवासी व आनंद बाजार सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये मतभेद झाले. या बैठकीत रहिवासी आणि गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
असा झाला वाद
दिव्यांग दुस्मान (२४) यांनी दिलेल्या तक्रारीत त्यांचे वडील भिकाजी (५६) हे राहत असलेल्या जवाहरनगर परिसरातील आनंद बाजार सहकारी गृहनिर्माण (नियोजित) या संस्थेचे अध्यक्ष आहेत. बैठकीदरम्यान येथील रहिवासी निखिल यादव हा तेथे आला, तुम्ही येथे मीटिंग का घेता, अशी विचारणा तक्रारदारांचे वडील भिकाजी यांच्याकडे केली. निखिलने वाद घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. भिकाजी बसलेल्या खुर्चीला पाठीमागून निखिल ने लाथ मारली. तसेच डोक्यात टपली मारून दमदाटी व शिवीगाळ केली. बैठक आटपून घरी जात असताना निखिल यादव, अनिकेत यादव, प्रकाश सहानी तसेच अनोळखी दहा ते बारा जणांनी त्यांना अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्यात १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.